यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या १५व्या हंगामात नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटनसच्या संघाने विजेतेपदाचा मान मिळवला. त्यानंतर संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने पंड्याचे अभिनंदन करण्यात व्यस्त आहे. बिहारमधल्या एका पठ्ठ्याने तर थेट आपले आणि आपल्या सलूनचे नाव पंड्याच्या नावाला अनुसरून ठेवले आहे. अशातच आता पंड्याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आपल्याला मिळालेल्या भेटीबाबत सांगितले आहे.
गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पंड्याला बिझनेसमन वीरा पहारियाने खास भेट दिली आहे. पंड्यानेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ही भेट शेअर केली आहे. त्याची पत्नी नताशा या गिफ्टचा व्हिडिओ बनवताना दिसत आहे. हे गिफ्ट मिळाल्याने पंड्या खूश दिसत आहे. ही भेट एक क्सटमाईज पेंडेंट आहे, ज्याच्या एका बाजूला गुजरात टायटन्स आणि दुसऱ्या बाजूला आयपीएल २०२२ विजेता कर्णधार असे लिहिलेले आहे. पंड्याने हे पेंडेंट गळ्यात घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर गुजरात टायटन्सचे गीतही ऐकू येत आहे.
आयपीएल २०२२च्या लिलावापूर्वी, गुजरात टायटन्सने त्यांच्या ड्राफ्टमध्ये कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचा समावेश केला होता. गुजरातच्या या निर्णयामुळे क्रिकेट तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले होते. अनेक माजी क्रिकेटपटू पंड्याच्या तंदुरुस्तीवर आणि कर्णधारपदावर शंका घेत होते. याचे कारण असे की पंड्या दीर्घकाळ गोलंदाजी करत नव्हता आणि त्याने उच्च स्तरावर कधीही कर्णधारपद भूषवले नव्हते. पण पंड्याने या आयपीएल हंगामात या सर्व शंकांना बगल देत गुजरातला आयपीएल २०२२ चा विजेता बनवले आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
दरम्यान, पंड्याचा या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ खेळाडूंमध्ये समावेश होता. त्याने ४४.२७च्या सरासरीने ४८७ धावा केल्या. यादरम्यान हार्दिकचा स्ट्राईक रेटही १३१.२६ इतका होता. या मोसमात त्याने एकूण ४ अर्धशतक केले. यासोबतच तो गोलंदाजीतही उत्कृष्ट होता. आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यातही तो ‘सामनावीर’ ठरला होता.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पाकिस्तानला हरवत बक्षीस म्हणून मिळालेली ‘ऑडी १००’ पाहून शास्त्री भावूक, ३७ वर्षांनंतर पाहिली कार
आयपीएलच्या महासंग्रामानंतर पुन्हा सुरू होणार मानांकित रणजी ट्रॉफी, नॉकआउट राउंडचे वेळापत्रक