देशात सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची धूम सुरू आहे. यंदा या देशांतर्गत स्पर्धेत अनेक स्टार भारतीय खेळाडू खेळत आहेत. स्पर्धेचा पहिला उपांत्यपूर्व सामना बडोदा आणि बंगाल यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कृणाल पांड्याच्या बडोद्यानं चमकदार कामगिरी करत 41 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना संघानं 172/8 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, बंगालचा संघ 18 षटकांत 131 धावांवर ऑलआऊट झाला.
या सामन्यात बंगालनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बडोदा संघाची सुरुवात चांगली झाली. शाश्वत रावत आणि अभिमन्यू सिंग यांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. रावत 26 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या स्पर्धेत आपल्या बॅटनं धुमाकूळ घालणारा पांड्या महत्त्वाच्या सामन्यात मात्र चालू शकला नाही. त्याला केवळ 10 धावा करता आल्या. त्याचा मोठा भाऊ आणि कर्णधार कृणाल पांड्याची बॅटही शांत राहिली. तो 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवालिक शर्मानं 24 धावांचं योगदान दिलं. त्याच्या खेळीच्या जोरावर बडोदा संघानं 20 षटकांत 7 गडी गमावून 172 धावा केल्या.
बंगालकडून मोहम्मद शमी, कनिष्क सेठ आणि प्रदिप्ता प्रामाणिक यांनी 2-2 बळी घेतले. या सामन्यात एक विकेट घेत भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीनं टी20 फॉरमॅटमध्ये 200 बळी पूर्ण केले. टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो भारताचा आठवा वेगवान गोलंदाज ठरला आहे.
प्रत्युत्तरात, लक्ष्याचा पाठलाग करताना बंगालची सुरुवात खूपच खराब झाली. संघाचे चार प्रमुख फलंदाज अवघ्या 31 धावांवर बाद झाले. येथून बंगालचा पराभव निश्चित दिसत होता. या सामन्यात बंगालचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. संघाकडून शाहबाज अहमदनं सर्वाधिक 36 चेंडूत 55 धावा केल्या.
बंगालचा संपूर्ण संघ 18 षटकांत 131 धावांत गारद झाला. बडोद्यासाठी हार्दिक पांड्यानं अप्रतिम गोलंदाजी करत 3 बळी घेतले आणि तीन झेलही घेतले. त्यांच्याशिवाय अतित सेठ आणि लुकमान मेरिवाला यांनीही प्रत्येकी 3 गडी बाद केले.
हेही वाचा –
जसप्रीत बुमराहच्या हाती निराशा, पाकिस्तानी खेळाडूनं जिंकला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार
बाबर आझमची कसोटीपाठोपाठ टी20 संघातूनही हकालपट्टी होणार? गेल्या 10 सामन्यांतील आकडेवारी खूपच लाजिरवाणी
आयसीसी क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडला मोठा फायदा! भारतीय खेळाडूंची घसरण