टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे प्रदर्शन निराशजनक राहिले. भारतीय संघ सुपर १२ च्या पुढे जाऊ शकला नाही. यामागे अनेक कारणे असले तरी, प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्याचा फॉर्म आणि फिटनेस हे देखील एक कारण होते. पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही कर्णधार विराट कोहलीने हार्दिकच्या फलंदाजीची क्षमता लक्षात घेऊन त्याला प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट केले. मात्र, यामुळे संघाचे संतुलन बिघडले आणि त्याचा फटका भारतीय संघाला सहन करावा लागला. त्यानंतर हार्दिकला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले. हार्दिकबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने मोठे वक्तव्य केले आहे.
अष्टपैलू खेळाडू हार्दिकबाबत बटने मोठी प्रतिक्रिया दिली. बटने हार्दिकला तिन्ही प्रकारामध्ये खेळण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. जर त्याला तिन्ही प्रकारामध्ये खेळायचे असेल तर आधी त्याला त्याच्या शरीरावर थोडे काम करावे लागेल, असे त्याने म्हटले आहे. बट त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “हा अतिशय चांगला निर्णय आहे. हार्दिकला काही काळ आपले शरीर तयार करण्याची गरज आहे. त्याला चांगल्या प्रशिक्षणाची आणि चांगल्या आहाराची गरज आहे. तरच तो तिन्ही प्रकारामध्ये खेळू शकेल. जर तसे झाले नाही तर त्याच्यापुढील आव्हाने वाढतील.”
फिटनेसमुळे हार्दिक या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर देखील जाऊ शकणार नाही. एका वृत्तानुसार, त्याला एनसीएला रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी त्याला फिटनेस सिद्ध करावा लागेल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने अहवालात म्हटले आहे की, हार्दिकचे दुखापतीतून सावरणे हे प्रामुख्याने त्याच्या विश्रांतीवर अवलंबून आहे. त्याने लवकरच एनसीएला भेट द्यावी आणि आम्ही त्याच्या फिटनेसच्या आधारे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याचा संघात समावेश करण्याबाबत निर्णय घेऊ.
हार्दिक गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात आतबाहेर होत आहे. तो भारतीय संघाकडून सातत्यपूर्णपणे खेळू शकलेला नाही. अलीकडेच तो टी२० विश्वचषकात दिसला होता. मात्र, आता त्याला पुन्हा एकदा फिटनेस मिळवण्यासाठी एनसीएमध्ये बोलावण्यात आले आहे.