भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या कसोटी क्रिकेटमध्ये कधीही पुनरागमन करू शकणार नाही, असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने व्यक्त केला आहे. मात्र, यामागचे कारणही त्याने उघड केले आहे. अलीकडेच हार्दिक पांड्या नेटमध्ये लाल चेंडूने सराव करताना दिसला आणि त्यानंतर तो कदाचित कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
पाठीवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर हार्दिक पांड्याने केवळ वनडे आणि टी20 सामन्यांसाठी स्वत:ला उपलब्ध करून दिले आहे. टी20 विश्वचषक 2023 दरम्यान त्याला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो अनेक महिन्यांनंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतला आणि प्रथम आयपीएल 2024 मध्ये सहभागी झाला. त्यानंतर 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेतही तो भारताकडून खेळला.
हार्दिकसाठी कसोटी क्रिकेट खेळणे कठीण
दरम्यान नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये हार्दिक लाल चेंडूने सराव करताना दिसत होता. त्यानंतर पुढच्या रणजी मोसमात तो खेळताना दिसणार असल्याचे मानले जात होते. हार्दिकने 2018 साली बडोद्यासाठी शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. आता पार्थिव पटेलने या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. पांढरा चेंडू उपलब्ध नसल्याने पांड्याने लाल चेंडूने सराव केल्याचे पार्थिव पटेलने सांगितले आहे.
पार्थिव पटेलचे म्हणणे आहे की, हार्दिकचे शरीर त्याला खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये गोलंदाजी करू देणार नाही. पार्थिव पटेल म्हणाला की, “हार्दिक पांड्याचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन अवघड आहे. त्यावेळी पांढरा चेंडू उपलब्ध नसल्याने तो लाल चेंडूनेच सराव करत होता. मला वाटत नाही की त्याचे शरीर त्याला चार दिवसीय आणि पाच दिवसीय सामने खेळू देईल. कसोटीत पुनरागमन करण्यासाठी त्याला किमान एक प्रथम श्रेणी सामना खेळावा लागेल, पण याची शक्यता फारच कमी आहे.”
हार्दिक पांड्याने भारताकडून शेवटचा कसोटी सामना 2018 मध्ये साउथम्प्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून सततच्या दुखापतींमुळे त्याला लाल चेंडूच्या क्रिकेटपासून दूर राहावे लागले. हार्दिक पांड्याने भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 31.29 च्या सरासरीने 532 धावा केल्या. या उजव्या हाताच्या अष्टपैलू खेळाडूने 31.05 च्या सरासरीने 17 विकेट्स घेतल्या, ज्यात एका सामन्यात पाच विकेट्सचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“आकाश दीपने मोहम्मद शमीचा आदर्श घ्यावा”, भारतीय दिग्गजाचा कामाचा सल्ला
5 क्रिकेटपटू ज्यांनी कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली, नंतर फलंदाजीत कमावलं नाव
कानपूर कसोटीत पावसाचा धुमाकूळ, तब्बल 9 वर्षांनंतर भारतात असं घडलं