भारतीय क्रिकेट संघाला जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयर्लंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात उभय संघ २ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा झाली असून अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याकडे संघाचे नेतृत्त्वपद सोपवले गेले आहे. वरिष्ठ खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याने नवख्या संघाला आयर्लंड दौऱ्यावर पाठवण्यात येणार आहे. अशात हार्दिक कर्णधार म्हणून मैदानात उतरताच ऐतिहासिक विक्रमाची पुनरावृत्ती होईल.
हार्दिक असेल एका वर्षातील पाचवा कर्णधार
आयर्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यासाठी (Ireland vs India) मैदानात उतरताच हार्दिक (Hardik Pandya) २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व करणारा पाचवा कर्णधार (Fifth Indian Captain In Year) बनेल. जानेवारी महिन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. त्यानंतर रोहित शर्माने मायदेशात वेस्ट इंडिज आणि श्रीलंकाविरुद्धच्या मालिकांमध्ये संघाचे नेतृत्त्वपद सांभाळले होते.
आता भारत भूमीत सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत रोहितला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्याजागी केएल राहुल संघाचे कर्णधारपद सांभाळणार होता. मात्र दुखापतीमुळे तो ही मालिका खेळू न शकल्याने त्याच्याजागी रिषभ पंतवर ही जबाबदारी दिली गेली आहे. पंतनंतर आता आयर्लंडविरुद्ध नेतृत्त्व करणारा हार्दिक भारतीय संघाचा यंदाच्या वर्षातील पाचवा कर्णधार असेल.
६३ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची होणार पुनरावृत्ती
यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एक वेळा असे झाले होते, जेव्हा ५ वेगवेगळ्या खेळाडूंनी भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. १९५९ मध्ये भारताने ९ सामने खेळले होते. या सामन्यांमध्ये विनू मंकड यांच्याव्यतिरिक्त हेमू अधिकारी, दत्ता गायकवाड, पंकज रॉय आणि गुलाबराय रामचंद यांनी संघाचे नेतृत्त्व केले होते.
टी२०तील असेल नववा कर्णधार
याखेरीज हार्दिक टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कमान सांभाळणारा नववा कर्णधार असेल. विरेंद्र सेहवाग हा भारताच्या टी२० संघाचा पहिला कर्णधार होता. त्याच्यानंतर एमएस धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि रिषभ पंत यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. आता या यादीत हार्दिकचेही नाव जोडले जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दुसरा चेतेश्वर पुजाराचं म्हणावे! मुंबईच्या सलामीवीराने तब्बल ५४ चेंडू खेळल्यानंतर काढली पहिली धाव
क्रिडामंत्र्याचे भर मैदानातच उतू गेले प्रेम, लव्ह लेटर दाखवत पत्नीसाठी केले हटके सेलिब्रेशन
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वीच आयर्लंडच्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, वाचा सविस्तर