भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळला गेलेला तिसरा टी२० सामना ऑस्ट्रेलियाने १२ धावांनी जिंकला. भारत या सामन्यात पराभूत झाला असला तरी, भारताने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेवर २-१ अशा फरकाने कब्जा केला. या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू हार्दिक पंड्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. मात्र, त्यानंतर हार्दिकने असे काही कृत्य केले की, सर्व क्रिकेटचाहत्यांचा आदर त्याने कमावला. आपल्याला मिळालेली मालिकावीराची ट्रॉफी त्याने नवोदित वेगवान गोलंदाज टी नटराजनकडे सोपवत, आदर्श वस्तुपाठ घालून दिला.
ऑस्ट्रेलियाने मिळवला तिसऱ्या सामन्यात विजय
पहिल्या दोन टी२० सामन्यात पराभूत झालेल्या, ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १८६ धावा उभारल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर मॅथ्यू वेडने सर्वाधिक ८० तसेच अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने तुफानी ५४ धावा फटकावल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २ बळी आपल्या नावे केले. टी नटराजन व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
भारताला पेलवले नाही १८७ धावांचे आव्हान
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. केएल राहुल दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर, कर्णधार विराट कोहली व शिखर धवन यांनी भारताचा डाव सावरला. मात्र, लेगस्पिनर मिचेल स्वॅपसनने दोन षटकांच्या अंतरात धवन, सॅमसन व अय्यर यांचे बळी मिळवत ऑस्ट्रेलिया सामन्यात पुनरागमन करून दिले. कर्णधार विराट व हार्दिक पंड्या यांनी भारताच्या विजयासाठी प्रयत्न केले. परंतु, त्यांना भारताला विजयापर्यंत घेऊन जाण्यात अपयश आले. अखेरीस, भारताला १२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
पंड्या ठरला मालिकावीर
आयपीएलपासून तुफान फॉर्मात असलेल्या हार्दिक पंड्याने या मालिकेतही धडाकेबाज कामगिरी नोंदवली. पहिल्या सामन्यात १६ धावा केल्यानंतर, त्याने दुसऱ्या सामन्यात २२ चेंडूत ४२ धावांची मॅचविनिंग खेळी केली. तिसऱ्या सामन्यातही त्याने १३ चेंडूत २० धावा काढून सामन्यात रंगत आणली होती. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हार्दिकचा दिलदारपणा
हार्दिकने आपल्याला मिळालेली मालिकावीराची ट्रॉफी या मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी करणार्या टी नटराजनला दिली. नटराजनने या मालिकेत चार बळी मिळविले असले तरी, त्याने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करताना, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना वेसण घातली होती. नटराजनने याच मालिकेतील पहिल्या सामन्यातून टी२० पदार्पण केले होते. टी२० मालिकेआधी झालेल्या वनडे मालिकेत त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
दुसऱ्या सामन्यावेळी केला होता नटराजनचा उल्लेख
हार्दिकने मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की,
‘तुम्ही मला सामनावीर म्हणून निवडले. मात्र, माझ्यामते या सामन्याचा खरा सामनावीर नटराजन आहे.’
नटराजनला प्रथम ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी राखीव गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळाले होते. परंतु, नंतर त्याचा समावेश टी२० व वनडे मालिकेसाठी भारतीय संघात करण्यात आला. त्याने या संधीचे सोने करत, जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळली.
संबंधित बातम्या:
– पदार्पणाच्या टी20 सामन्यातच टी नटराजन बुमराह, हार्दिकच्या पंक्तीत सामील
– INDvsAUS: स्वेप्सनने वाचवला ऑस्ट्रेलियाचा ‘क्लीन स्वीप’, तिसऱ्या टी२० सामन्यात भारत १२ धावांनी पराभूत
– म्हणून बदलली बॅट, सामनावीर हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा