भारतीय महिला क्रिकेट संघाची स्फोटक फलंदाज हरमनप्रीत कौर इंग्लंड मधल्या टी-२० लीगला मुकणार आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तिला किया सुपर लीग २०१७ मध्ये भाग घेता येणार नाही.
नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरीमुळे हरमनप्रीतची सगळीकडे चर्चा झाली. हरमनप्रीत सरे स्टार्स संघाकडून टी -२० लीग खेळणार होती मात्र दुखापतीमुळे तिने माघार घेतली. विश्वचषकाच्या शेवटच्या काही सामन्यांमध्ये ती पूर्णपणे फिट नव्हती मात्र फिजिओ व बाकी स्टाफच्या मदतीमुळे तिला खेळ चालू ठेवता आला. मात्र पुन्हा खेळताना दुखापत होऊ नये म्हणून आणि दुखापत अजून गंभीर होऊ नये याकरता तिला महिनाभर विश्रांती घ्यायला सांगितली आहे.
हरमनप्रीत या पूर्वी वूमेन्स बिग बॅश लीग मध्ये खेळली होती आणि ती या लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर बनली होती. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हरमनप्रीतला म्हणूनच इंग्लडच्या टी-२० लीग मध्ये सामील करून घेतले होते.
भारतीय महिला संघाच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले तसेच घरी परतल्यावर हरमनप्रीतचे प्रशासकीय आणि राजकारणी मंडळींनी अक्षरशः जंगी स्वागत केले.