ऑकलंड। न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषकात १८ वा सामना भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. असे असले तरी, भारतीय संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर हिने या सामन्यादरम्यान मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात भारतीय महिला संघाने (India Women vs Australia Women) प्रथम फलंदाजी केली होती. भारतीय संघाकडून हरमनप्रीतने ५ व्या क्रमांकावर आक्रमक फलंदाजी करताना ४७ चेंडूत ६ चौकारांसह ५७ धावांची नाबाद खेळी केली. यामुळे तिच्या आता महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेत आत्तापर्यंत ५ सामन्यांत ६४ च्या सरासरीने २५६ धावा झाल्या आहेत. यामध्ये तिच्या एका शतकाचा आणि दोन अर्धशतकांचाही समावेश आहे.
यामुळे आता हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) एका महिला विश्वचषक स्पर्धेत ५ व्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. तिने ऑस्ट्रेलियाच्या शेरॉन ट्रेड्रिया यांच्या ४० वर्षे जुन्या विक्रमाला मागे टाकले आहे. शेरॉन ट्रेड्रिया यांनी १९८२ साली झालेल्या विश्वचषकात १२ सामन्यांत ५ किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना २३७ धावा केल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजची अनुभवी क्रिकेटपटू डिएंड्रा डॉटीन आहे. तिने २०१३ साली विश्वचषकात ७ सामन्यांत २२६ धावा केल्या होत्या (Most runs batting at No.5 or lower in a Women’s World Cup edition).
इतकंच नाही, तर हरमनप्रीत एका महिला विश्वचषक स्पर्धेत ५ व्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना तीनवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारी पहिलीच क्रिकेटपटू ठरली आहे.
भारताचा पराभव
हरमनप्रीतसाठी महिला विश्वचषक २०२२ (Women’s World Cup 2022) वैयक्तिकरित्या चांगला ठरत असला, तरी भारतीय संघाची (India Women’s team) या स्पर्धेतील कामगिरी संमिश्र झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही भारताला अखेरच्या षटकात पराभव स्विकारावा लागला.
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २७७ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २८० धावा करत सामना जिंकला आणि या स्पर्धेतील आपला सलग ५ वा विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीसाठी आपले तिकीट पक्के केले आहे.
भारतासाठी मात्र, या पराभवामुळे पुढील मार्ग कठीण झाला आहे. भारताने या विश्वचषकातील ५ साखळी सामन्यांतील २ सामने जिंकले आहेत, तर ३ सामने पराभव स्विकारला आहे. आता भारताला दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश संघांविरुद्ध सामने खेळायचे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहली, गंभीरमधील २०१३च्या विवादावर व्यक्त झाला केकेआरचा माजी कर्णधार, दिलीय अशी प्रतिक्रिया
आयपीएलची खरी रनमशीन आहे ‘हा’ कर्णधार; धोनी, रोहित, वॉर्नरलाही सोडलंय मागे