भारतीय महिला आणि टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तिच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. तसेच वूमेन्स बिग बॅश लीग २०२१ स्पर्धेत देखील तिचा बोलबाला पाहायला मिळाला. या स्पर्धेत तिने मोठा पुरस्कार मिळवत कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.
वूमेन्स बिग बॅश लीग २०२१ स्पर्धेत मेलबर्न रेनेगड्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हरमनप्रीत कौरने अप्रतिम कामगिरी करत धावांचा पाऊस पाडला. तिने या स्पर्धेतील ११ सामन्यात १३५.२५ च्या सरासरीने ३९९ धावा केल्या.या दरम्यान तिने १८ षटकार मारले. गोलंदाजी करताना तिने २०.४ च्या सरासरीने १५ गडी बाद केले. या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर तिची वूमेन्स बिग बॅश लीग २०२१ स्पर्धेत ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ म्हणून निवड करण्यात आली आहे. असा कारनामा करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
प्लेअर ऑफ द टूर्नामेंटसाठी झालेल्या मतदानात हरमनप्रीत कौरला सर्वाधिक ३१ मते मिळाली. तिच्यापाठोपाठ पर्थ स्कॉचर्स संघाकडून खेळणाऱ्या बेथ मुनी आणि सोफी डेव्हाईन यांना प्रत्येकी २८ मते मिळाली, तर ब्रिस्बेन हीटकडून खेळणाऱ्या ग्रेस हॅरिसला २५ आणि जॉर्जिया रेडमायनला २४ मते मिळाली. गेल्या २ हंगामापासून सोफी डिव्हाईन ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ची मानकरी ठरत होती. परंतु, यावेळी तिचं जेतेपद ३ मतांच्या फरकाने हुकलं.
हा पुरस्कार कोणाला मिळेल हे ठरवण्यासाठी प्रत्येक सामन्यात दोन्ही पंचांना सामन्यातील ३ सर्वोत्कृष्ट खेळाडूंना ३-२-१ असे मत देण्याची मुभा दिलेली असते. एका खेळाडूला एका सामन्यात जास्तीत जास्त ६ मत मिळू शकतात. या जोरावर हरमनप्रीतने ११ सामन्यांत ३१ मते मिळवली आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचा मान पटकावला.
It had to be, didn't it? @ImHarmanpreet has been outstanding with bat ???????????? ball for the @RenegadesWBBL and is your #WBBL07 Player of the Tournament! ???? pic.twitter.com/nCBoyDec6R
— Weber Women's Big Bash League (@WBBL) November 24, 2021
नुकत्याच झालेल्या ब्रिस्बेन हीटविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरने आजारपणामुळे फलंदाजी केली नव्हती. या सामन्यात मेलबर्न रेनेगड्स संघाला ४३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. हरमनप्रीत कौर गुरुवारी (२५ नोव्हेंबर) चॅलेंजर्स सामन्यात खेळेल, ज्यामध्ये विजय मिळवणाऱ्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
केव्हा आणि कुठे सुरू होणार आयपीएल २०२२ स्पर्धा? मोठी अपटेड आली समोर
‘भारताची जुनी जर्सी पुन्हा आणायची वेळ आली’, वसीम जाफर यांचा अजब सल्ला
डीविलियर्स, विराटसारख्या दिग्गजांनी केला धनश्री वर्माच्या इशाऱ्यावर डान्स, पाहा व्हिडिओ






