भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये टी-२० मालिका खेळवली जात आहे. यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. पहिला टी-२० सामना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने डीएलएस पद्धतीनुसार जिंकला. सिडनीनंतर आता संघ दुसरा टी-२० सामना कॅनबेरामध्ये खेळत आहे. हा सामना खेळण्यासाठी उतरताच हरमनप्रीत कौरने इतिहास घडवत विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील दुसऱ्या टी-२० सामन्याची नाणेफेक भारतीय संघाने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून जॉर्जिया वॉल व बेथ मुनी यांनी संघाला दणक्यात सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघींनी १२८ धावांची भागीदारी रचली. बेथ मुनीने ४६ धावांची खेळी केली, तर जॉर्जिया वॉलने ५७ चेंडूत ११ चौकार व एका षटकारासह ८८ धावा केल्या. याशिवाय इतर सर्व फलंदाज भारताच्या गोलंदाजीसमोर धावा करू शकले नाहीत.
कॅनबेरामध्ये सुरू असलेल्या हा टी-२० सामना हरमनप्रीत कौरच्या कारकिर्दीतील ३५६वा सामना आहे. यासह हा सामना खेळण्यासाठी उतरताच हरमनप्रीत महिला क्रिकेट इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली खेळाडू ठरली आहे. तिच्याआधी हा विक्रम सुझी बेट्सच्या नावे होता. हा विश्वविक्रम न्यूझीलंडच्या क्रिकेट दिग्गज सुझी बेट्सचा विक्रम मोडून आपल्या नावे केला आहे, जिने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३५५ सामने खेळले होते.
तिसऱ्या स्थानावर या यादीत ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी आहे, जिने आतापर्यंत ३४९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. चौथ्या स्थानावर भारताची महान फलंदाज मिताली राज आहे, जिने ३३३ सामने खेळले आहे. तर पाचव्या स्थानी इंग्लंड संघाची चार्लोट एडवर्ड्स आहे, जिने आपल्या कारकिर्दीत ३०९ सामने खेळल आहेत.






