---Advertisement---

कहर! एकही चेंडू न खेळता फलंदाज बाद, 12 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं

On: मंगळवार, फेब्रुवारी 28, 2023 12:07 PM
Harry-Brook-Diamond-Duck
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे शेवट झाला. पहिला सामना जिंकून इंग्लंडचा आत्मविश्वास भलताच वाढला होता. याच आत्मविश्वासाला तडा देण्याचे काम न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत केले. हा सामना न्यूझीलंडने अवघ्या 1 धावेने खिशात घातला. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडकडून दीडशतक झळकावणाऱ्या पठ्ठ्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. तो खेळाडू इतर कुणी नसून हॅरी ब्रूक आहे.

हॅरी ब्रूक डायमंड डक (Harry Brook Diamond Duck)
नाणेफेक गमावत इंग्लंड संघ फलंदाजीला उतरला होता. यावेळी त्यांनी पहिले 3 विकेट्स 6.1 षटकात 21 धावांवर झटपट गमावले होते. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हॅरी ब्रूक (Harry Brook) याने जो रूट (Joe Root) याच्यासोबत 302 धावांची भागीदारी रचली होती. यामध्ये रूटच्या 107, तर ब्रूकच्या 186 धावांचा समावेश आहे. ब्रूकने पहिल्या डावात 176 चेंडूंचा सामना करताना 186 धावा चोपल्या होत्या. या धावा त्याने 5 षटकार आणि 24 चौकारांच्या मदतीने कुटल्या होत्या. रूट (नाबाद 153) आणि ब्रूकच्या फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 435 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, ब्रूकला दुसऱ्या डावात दमदार कामगिरीचं सातत्य ठेवता आलं नाही. तो डायमंड डक झाला.

https://twitter.com/dommodernist/status/1630334126485118981

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून 22वे षटक कर्णधार टीम साऊदी टाकत होता. यावेळी रूट स्ट्राईकवर, तर ब्रूक नॉन-स्ट्राईकवर होता. साऊदीने रूटला चेंडू टाकताच त्याने फटका मारला. यावेळी धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज धावले असता मायकल ब्रेसवेलने चेंडू पकडत यष्टीरक्षक टॉम ब्लंडेल याच्याकडे चेंडू फेकला. यावेळी ब्लंडेलने क्षणाचाही विलंब न करता ब्रूकला धावबाद केले. अशाप्रकारे ब्रूक एकही चेंडू न खेळता शून्य धावेवर बाद झाला. याला ‘डायमंड डक’ (Diamond Duck) असे म्हणतात.

https://twitter.com/Rise_Cricket/status/1630372137990230017

तब्बल 12 वर्षांनंतर घडलं असं
हॅरी ब्रूक कसोटी क्रिकेटमध्ये 12 वर्षांनंतर डायमंड डक (एकही चेंडूचा सामना न करता बाद होणे) होणारा फलंदाज ठरला. त्याच्यापूर्वी 2010मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज सायमन कॅटिच (Simon Katich) हादेखील अशाच पद्धतीने बाद झाला होता.

हॅरी ब्रूकचा असाही कारनामा
हॅरी ब्रूक हा एकाच कसोटीत 50हून अधिक धावा करणारा आणि डायमंड डक होणारा एकमेव खेळाडू ठरला. पहिल्या डावात तो 176 चेंडूंचा सामना करताना 186 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात तो शून्य चेंडू खेळून शून्य धावेवर बाद झाला. त्याच्यापूर्वी इंग्लंडचा माँटी पानेसर हा एकमेव खेळाडू आहे, जो 2008मध्ये ओव्हल मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डायमंड डक झाला होता. (Harry Brook is first recognized batter in 12 years to get a diamond duck in Test cricket)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फाॅलोऑन मिळाल्यानंतरही न्यूझीलंडने केली कमाल, सगळ्यांना झाली कोलकाता कसोटीची आठवण
सुवर्णक्षण! गेल्या 22 वर्षात क्रिकेटमध्ये कधीही न पाहिलेला क्षण, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---