इंडियन प्रीमियर लीग 22 मार्चपासून सुरू होत आहे. मात्र त्याआधी ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला. 4 कोटी रुपये खर्चून दिल्ली कॅपिटल्समध्ये समाविष्ट झालेला इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
हॅरी ब्रूकनं वैयक्तिक कारण सांगून आयपीएल 2024 मधून आपलं नाव मागे घेतलं. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये त्याची कामगिरी खूपच खराब राहिली होती.
2023 च्या हंगामात हॅरी ब्रूकला सनरायझर्स हैदराबादनं 13.25 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. मात्र त्याला 21 पेक्षा कमी सरासरीनं फक्त 190 धावा करता आल्या. परिणामी, फ्रँचायझीनं त्याला मिनी लिलावापूर्वी सोडलं. यानंतर दिल्ली कॅपिटल्सनं त्याला 4 कोटी रुपयांना विकत घेतलं.
ब्रूक नुकत्याच भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघातही नव्हता. त्यानं शेवटच्या क्षणी कसोटी मालिकेतून आपलं नाव मागे घेतलं होतं. ब्रूकनं इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडे (ECB) कुटुंबाला वेळ देण्याची मागणी करत आपलं नाव मागे घेतलं होतं.
इंग्लिश खेळाडूंची वृत्ती लक्षात घेऊन आयपीएल फ्रँचायझींमध्ये नाराजी आहे. वास्तविक, अशा प्रकारे आयपीएलपूर्वी अनेक संघांचं संयोजन विस्कळीत होतं. आता आयपीएल फ्रँचायझी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत (बीसीसीआय) या समस्येचं निराकरण करण्याचा विचार करत आहेत.
एका फ्रँचायझी अधिकाऱ्यानं सांगितलं की, “एकदा खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या वचनबद्धतेचा आदर केला पाहिजे. यातून माघार घेणं अव्यावसायिक आहे. बीसीसीआयने याकडे लक्ष द्यावं.”
माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रानंही ‘X’ वर पोस्ट करत हॅरी ब्रूकच्या निर्णयावर टीका केली आहे. “आयपीएल लिलावात इंग्लिश खेळाडूंना आपल्या जबाबदारीवर खरेदी करा”, असं त्यानं लिहिलं.
याआधीही अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून अचानक माघार घेतली आहे. यामध्ये इंग्लंडचेच ॲलेक्स हेल्स आणि जेसन रॉय यांचा समावेश होतो. मिचेल स्टार्क सारख्या खेळाडूंनीही अशीच कारणं सांगून यापूर्वी आपली नावे मागे घेतली आहेत. आता ब्रूकनं दिल्ली कॅपिटल्स संघातून माघार घेतल्यानं त्याच्या बदली खेळाडूचा शोध सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऋषभ पंत तब्बल 662 दिवसांनंतर दिसला दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीत, IPL 2024 साठी प्रॅक्टिस सुरू