मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यात एकापाठोपाठ एक शतकं दिसत आहेत. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जो रुटनं शतक झळकावलं. त्यानंतर आता हॅरी ब्रूकनं देखील 100 धावा ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, ब्रूकनं पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत केवळ 6 डावांत फलंदाजी केली असून यामध्ये त्याचं हे चौथं शतक आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे एकूण सहावं शतक आहे.
सामन्याच्या 50 व्या षटकात 84 धावा केल्यानंतर बेन डकेट आऊट झाला. त्यानंतर हॅरी ब्रूक फलंदाजीसाठी मैदानात उतरला. तो क्रिजवर येताच धावफलक वेगानं हलू लागला. ब्रूकनं अवघ्या 49 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर त्यानं 118 चेंडूत शतक ठोकलं. ब्रूक ज्या पद्धतीनं आपली कारकीर्द पुढे नेतोय, त्याच्यामध्ये डॉन ब्रॅडमनची झलक दिसते आहे.
हॅरी ब्रूकनं यापूर्वी देखील पाकिस्तानात जाऊन आपल्या फलंदाजीनं खळबळ माजवली होती. 2022 मध्ये रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यानं 153 धावा ठोकल्या होत्या. त्या सामन्याच्या दुसऱ्या डावातही तो शतकाच्या दिशेनं वाटचाल करत होता, मात्र तो 87 धावा करून बाद झाला.
2022 मध्ये झालेल्या याच मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 25 वर्षीय ब्रूकनं 108 धावांची खेळी केली होती. मालिकेचा तिसरा सामना कराचीमध्ये खेळला गेला, ज्याच्या पहिल्या डावात ब्रूकनं 111 धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या या युवा फलंदाजानं 2022 च्या पाकिस्तान मालिकेत 93.6 च्या सरासरीनं 468 धावा केल्या होत्या.
हॅरी ब्रूकनं आतापर्यंत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 31 डावांमध्ये 6 शतकं आणि 9 अर्धशतकं झळकावली आहेत. याचाच अर्थ तो जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या डावात 50 किंवा त्याहून अधिक धावा करतो. ब्रूक इंग्लंडचा नवा सुपरस्टार मानला जातोय. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 57 पेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे तो 86 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं धावा करतोय. कसोटी सामन्यांमध्ये 86 चा स्ट्राईक रेट हे त्याच्या स्फोटक फलंदाजीचं प्रतीक आहे.
हेही वाचा –
रोहित शर्माचा साधेपणा! भर रस्त्यात थांबून दिल्या चाहतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा; सुंदर VIDEO व्हायरल
आयसीसी रँकिंग : अर्शदीप सिंगची टॉप 10 मध्ये एंट्री! हार्दिक पांड्यालाही बंपर फायदा
अजिबात ब्रेक नाही! कसोटी मालिकेसाठी हिटमॅनची जोरदार तयारी, VIDEO पाहा