शारजाह। सोमवारी (११ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात पार पडलेल्या एलिमिनेटरच्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभवाचा धक्का बसला. त्यांना ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघाने ४ विकेट्सने पराभूत केले. यासह बेंगलोरचे या हंगामातील आव्हान संपले. असे असले तरी, बेंगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने त्याच्या गोलंदाजीने या हंगामात सर्वांनाच प्रभावित केले. त्याने एक मोठा विक्रमही केला.
कोलकाता विरुद्ध हर्षलने ४ षटके गोलंदाजी करताना १९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याने शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर या कोलकाताच्या सलामी जोडीला बाद केले. या विकेट्ससह त्याने या आयपीएल हंगामात ३२ विकेट्स पूर्ण केल्या. त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाच्या ड्वेन ब्रावोची बरोबरी केली.
ब्रावोने २०१३ साली चेन्नईकडून १८ सामने खेळताना ३२ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आता एका आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हर्षल आणि ब्रावो संयुक्तरित्य अव्वल क्रमांकावर आहेत. तर त्यांच्यापाठोपाठ कागिसो रबाडा आहे. रबाडाने २०२० हंगामात ३० विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे एका आयपीएल हंगामात ३० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा या तीन गोलंदाजांनाच करता आला आहे.
एका आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
३२ विकेट्स – ड्वेन ब्रावो (२०१३)
३२ विकेट्स – हर्षल पटेल (२०२१)
३० विकेट्स – कागिसो रबाडा (२०२०)
२८ विकेट्स – जेम्स फॉकनर (२०१३)
२८ विकेट्स – लसिथ मलिंगा (२०११)
२७ विकेट्स – जसप्रीत बुमराह (२०२०)
एका सर्वाधिक विकेट्स घेणारा अनकॅप खेळाडू
हर्षल पटेलने एका आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या अनकॅप खेळाडूंमध्ये (आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेले खेळाडू) अव्वल क्रमांक मिळवला आहे. या यादीत त्याने युजवेंद्र चहलला मागे टाकले आहे. चहलने २०१५ साली बेंगलोरसाठी २३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी चहलचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही झाले नव्हते. त्याचप्रमाणे हर्षलने अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही. त्यामुळे आता त्याने या यादीत चहलला मागे टाकले आहे.
विशेष म्हणजे या यादीत अवेश खानही २३ विकेट्सह चहलबरोबर संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यालाही चहलला मागे टाकण्याची संधी आहे. अवेशने या २३ विकेट्स यंदाच्याच हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना घेतल्या आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान अद्याप संपलेले नाही. त्यामुळे तो चहलला या यादीत मागे टाकू शकतो.
एका आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारे अनकॅप खेळाडू
३२ विकेट्स – हर्षल पटेल (आरसीबी, २०२१)
२३ विकेट्स – युजवेंद्र चहल (आरसीबी, २०१५)
२३ विकेट्स – अवेश खान (दिल्ली, २०२१)*
२१ – श्रीसंत अरविंद (आरसीबी, २०११)
२१ – सिद्धार्थ कौल (हैदराबाद, २०१८)
आयपीएल २०२१ मधील कामगिरी
हर्षलने आयपीएल २०२१ हंगामात १५ सामने खेळताना १४.३४ च्या सरासरीने ३२ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने १ वेळा सामन्यात ५ विकेट्स आणि १ वेळा सामन्यात ४ विकेट्स घेण्याचा कारनामा केला. त्याने हा कारनामा मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध केला. त्याने एमए चिदंबरम स्टेडियवर खेळताना मुंबईविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या होत्या. तर, दुबईमध्ये खेळताना ४ विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे त्याने दुबईमध्ये मुंबईविरुद्ध हॅट्रिकही घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरचा नाद खुळा विक्रम! आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा एकमेव संघ






