भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने त्याच्या गोलंदाजीविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे अगोदर त्याला गोलंदाजी करण्यामध्ये काही अडचणी येत होत्या. मात्र, झहीर खानने दिलेल्या काही टिप्सनंतर त्याच्या गोलंदाजीत सुधारणा झाली आहे. त्याच्या मते झहीर खानने दिलेल्या सल्लामुळे त्याला खूप मदत मिळाली.
आयपीएलमध्ये हर्षल पटेल दिल्ली कॅपिटल्स संघाचा महत्वाचा भाग होता. त्यांने सांगितले की आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात त्याला झहीर खानसोबत बोलण्याची संधी मिळाली होती. झहीर मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक असून त्याच्यासोबत बोलण्याची संधी मिळाल्यानंतर हर्षलने त्याला काही प्रश्न विचारले. ज्यानंतर झहीरने त्याला मोलाचा सल्ला दिला. हर्षल २०२१ मध्ये दिल्ली संघाला रामराम करत बेंगलोर संघाचा भाग बनला होता. हर्षल पटेलने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “जेव्हा मी दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग असताना आमचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होता. तेव्हा मला झहीर भाईशी बोलण्याची संधी मिळाली होती. मला माझ्या गोलंदाजीत लेग स्टंपकडे ड्रिफ्ट करण्यात खूप अडचण होत असायची. मी याबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी त्यावेळी शोधून काढले की, माझ्या तंत्रात चूक आहे. ज्या एंगलने मी गोलंदाजी करतो, त्याने जर मी ऑफ स्टंपवर चेंडू टाकला तर तो आपोआप लेग स्टंपवर जायचा. त्यानंतर झहीर भाईनी सांगितले की, रिलीज एंगल सहाव्या किंवा सातव्या स्टंपच्या रेषेत असायला पाहिजे. त्यानंतर चेंडू ऑफ स्टंपवर जाईल. झहीर भाईच्या या सल्यामुळे मला खूप मदत मिळाली.”
दरम्यान, मागच्या काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या आयपीएलच्या १४ व्या हंगामात हर्षल पटेलने चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. बेंगलोर संघाला या हंगामात हर्षल पटेलमुळे चांगला फायदा मिळाला. हर्षल यावर्षी आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याच्ये आयपीएलमधील प्रदर्शन पाहूनच त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. त्याने न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.