भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. न्यूझीलंडनं मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता उभय संघांमधील तिसरी आणि अंतिम कसोटी 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळली जाईल.
या सामन्यापूर्वी मंगळवारी बातमी आली होती की, वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असून त्याला पदार्पणाचीही संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती की, हर्षितला कोणत्या गोलंदाजाच्या जागी खेळवलं जाईल. मात्र आता भारताचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी या गोष्टींवरील पडदा उघडला आहे. हर्षित न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पदार्पण करणार नसल्याचं अभिषेक नायर यांनी सांगितलं.
काल काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत हर्षित राणाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याची मुंबई टेस्टसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. तो या कसोटीद्वारे पदार्पण करेल, अशीही शक्यता वर्तवली जात होती. बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी भारतीय टीम मॅनेजमेंट त्याला खेळवण्याचा विचार करत असल्याचं बोललं जात होतं. परंतु आता अभिषेक नायर यांनी संपूर्ण चित्र स्पष्ट केलं आहे.
बुधवारी पत्रकार परिषदे बोलताना अभिषेक नायर यांनी हर्षित राणाला मुख्य संघात स्थान दिलं नसल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, “संघात कोणाचाही समावेश करण्यात आलेला नाही. प्रत्येक आठवडा महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. आम्ही सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलबद्दल विचार करत नाही. आम्हाला या सामन्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे.”
हर्षित राणा बऱ्याच काळापासून भारतीय संघासोबत आहे. परंतु त्याला अद्याप कोणत्याही फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. त्याची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. अशा परिस्थितीत आता हर्षितचं पदार्पण ऑस्ट्रेलियातच होणार असं दिसतं.
हेही वाचा –
केएल राहुलनं लखनऊची साथ सोडली! लिलावात हे 4 संघ लावू शकतात मोठी बोली
बुमराहचं अव्वल स्थान गेलं, रोहित-विराटचीही मोठी घसरण! ताजी कसोटी क्रमवारी जाणून घ्या
ऑस्ट्रेलियानं मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ वाढवला, पॅट कमिन्स या स्पर्धेपर्यंत करणार संघाचं नेतृत्व