टी२० विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला होता. पाकिस्तानने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने एक षटक राखून पूर्ण केले होते. या विजयासह ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली आणि पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर झाला. मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेडच्या फटकेबाजीने पाकिस्तानकडून सामना हिरावून घेतला होता.
मॅथ्यू वेडने १७ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या होत्या, तर स्टॉयनिसने ३१ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या होत्या. या उपांत्य सामन्यात हसन अलीने मॅथ्यू वेडचा झेल सोडला आणि सामन्याचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला होता. महत्वाच्या क्षणी झेल सोडल्याने हसन अली खूप ट्रोल झाला आहे. त्याचा फटका आता त्याच्या कुटुंबातील सदस्यांना देखील होत आहे. पाकिस्तानी क्रिकेट चाहते सोशल मीडियावर हसन अलीला फक्त शिव्या देत नाहीत, तर त्याची भारतीय वंशाची पत्नी सामिया आरजू आणि कुटुंबासाठीही अपशब्द वापरत आहेत.
आता याप्रकरणी हसन अलीचे सासरे लियाकत अली यांचे वक्तव्य आले आहे. ते म्हणाले की, ‘खेळ हा खेळ असतो. तो खेळ म्हणून घेतला पाहिजे. सामन्यात विजय-पराजय होत असतात. मात्र त्यानंतर खेळाडूवर टीका करणे अत्यंत चुकीचे आहे. माझ्या मुलीला आणि जावयाला वाईट बोलू नये.’ त्यांनी एका वृत्तपत्राशी संवाद साधतांना पुढे सांगितले की, ‘माझ्या मते भारतीय संघ मजबूत आहे, पण त्यांना पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाला देखील टीकेला सामोरे जावे लागले होते.’
हसन अलीची पत्नी सामिया दुबईस्थित एअर एमिरेट्स एअरलाइनमध्ये फ्लाइट इंजिनियर आहे. सामियाचे वडील लियाकत हे हरियाणातील नूह जिल्ह्यातील चंदेनी गावचे रहिवासी आहेत. ते २०११ मध्ये ब्लॉक विकास अधिकारी म्हणून निवृत्त झाले.
टी२० विश्वचषकात सलग पाच सामने जिंकून पाकिस्तानच्या संघाचा प्रवास ऑस्ट्रेलियाने संपवला. पाकिस्तान संघाने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना १७७ धावांचे लक्ष्य ठेवले आणि त्यानंतर पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाला १५ षटकांत ५ गडी गमावून ११६ धावांवर रोखून धरले होते. मात्र, त्यानंतर पुढील चार षटकांत खेळ बदलला.
सामनावीर मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस यांनी सहाव्या गड्यासाठी अभेद्य भागीदारी रचत अवघ्या ६.४ षटकांत नाबाद ८१ धावा केल्या. या स्पर्धेतील सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक असलेला डावखुरा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या १९ व्या षटकात मॅथ्यू वेड याने तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
मुख्य प्रशिक्षकपदासाठी असा होता बीसीसीआयचा ‘प्लॅन बी’; ‘या’ दिग्गजाशी झालेली चर्चा
ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड कोण जिंकणार टी२० विश्वचषक? सुनील गावसकरांनी केले भाकीत
जाफर रॉक्स! विलियम्सन-विराटवर केले गमतीदार ट्विट; चाहते झाले लोटपोट