महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्झ महिला संघात खेळला गेला. हा सामना मुंबईने 72 धावांनी खिशात घातला. या सामन्यात मुंबईची वेगवान गोलंदाज इसाबेल वोंग हिने इतिहास रचला. इसाबेलने या सामन्यात हॅट्रिक घेतली. अशाप्रकारे ती डब्ल्यूपीएल स्पर्धेत हॅट्रिक घेणारी पहिली महिला खेळाडू बनली. चला तर तिने कोणकोणत्या फलंदाजांना बाद केले जाणून घेऊयात…
झाले असे की, यूपी वॉरियर्झ संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबई इंडियन्स महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 182 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला यूपी संघ संघर्ष करताना दिसला. त्यांच्या पहिल्या तीन विकेट्स या 4.1 षटकात 21 धावांवर पडल्या होत्या. त्यानंतर किरण नवगिरे (Kiran Navgire) हिने डाव सांभाळला. तिने यावेळी 27 चेंडूत 43 धावा चोपत संघाची धावसंख्या 21वरून 84 धावांपर्यंत नेली. मात्र, तिला पुढे तंबूत परतावे लागले.
https://twitter.com/wplt20/status/1639310119774355462
इझी वोंग हॅट्रिक
मुंबईकडून 13वे षटक टाकण्यासाठी इझी वोंग (Issy Wong) क्रीझवर आली होती. यावेळी तिचा सामना करण्यासाठी स्ट्राईकवर नवगिरे होती. वोंगने पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर वोंगने वैयक्तिक 43 धावांवर खेळत असलेल्या नवगिरेला नॅट सायव्हर-ब्रंट हिच्या हातून डीप मिड-विकेटवर झेलबाद केले. त्यानंतर सातव्या क्रमांकावर सिमरन शेख फलंदाजीला आली. यावेळी वोंगने तिसऱ्या चेंडूवर सिमरनलाही त्रिफळाचीत करत तंबूत धाडले. पुढे आठव्या स्थानी फलंदाजी करण्यासाठी सोफी एक्लेस्टोन आली. यावेळी वोंग हॅट्रिकवर होती. तिने चौथा चेंडू टाकत सोफीलाही त्रिफळाचीत केले आणि आपली हॅट्रिक पूर्ण केली. सिमरन आणि सोफी यावेळी खातेही उघडू शकले नाहीत.
इझी वोंगची कमाल गोलंदाजी
इझी वोंग हिने या हॅट्रिक घेण्यापूर्वी यूपीच्या डावातील पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवर ताहलिया मॅकग्रा हिला बाद केले होते. अशाप्रकारे वोंगने 4 षटके गोलंदाजी करताना 15 धावा खर्च करत 4 विकेट्स नावावर केल्या.
सामन्याचा आढावा
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 182 धावा करत यूपीला 183 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, हे आव्हान पार करण्यात यूपी संघ अपयशी ठरला. यूपीला यावेळी 17.4 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 110 धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईने हा सामना 72 धावांनी जिंकत अंतिम सामन्यात धडक दिली.
https://twitter.com/mipaltan/status/1639315725272727559
आता डब्ल्यूपीएल 2023 (WPL 2023) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 26 मार्च) दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला (Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women) संघात ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO । एलिमिनेटर सामन्यात हरमनप्रीतवर नामुष्की, यूपीच्या सोफीने केले क्लीन बोल्ड
Video: इंग्लंडच्या पंतप्रधानांनी केला आपल्याच देशाच्या घातक वेगवान गोलंदाजांचा सामना, जॉर्डनने घेतली विकेट






