शुक्रवारी (२ ऑक्टोबर) आयपीएल २०२० चा चौदावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना हैदराबादने ७ धावांनी जिंकला. हा त्यांचा या हंगामातील दुसरा विजय होता. चेन्नईला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने मात्र या सामन्यात एक विक्रम रचला आहे.
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबाद संघाने ५ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या होत्या. हैदराबाद संघाच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून धोनीने नाबाद ४७ धावांची खेळी केली. या खेळीसह तो टी२० क्रिकेट प्रकारात सलग १०० सामने खेळताना एकदाही शून्य धावेवर बाद न होणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी २०१५ साली आयपीएलमध्ये मुंबई विरुद्धच्या क्वॉलिफायर सामन्यात धोनी शून्यावर बाद झाला होता.
धोनीव्यतिरिक्त टी२० क्रिकेट प्रकारात सलग १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळताना शून्यावर बाद न होण्याचा विक्रम ख्रिस गेल, दिनेश चंदिमल, शॉन मार्श आणि जेपी ड्यूमिनी यांच्या नावावर आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर गेल असून त्याने टी२० क्रिकेट प्रकारात शून्यावर बाद न होता २०१२ ते २०१६ दरम्यान १४५ सामने खेळले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज दिनेश चंदिमल आहे. त्याने २००९ पासून आतापर्यंत १०६ सामने शून्यावर बाद न होता खेळत आहे. सोबतच तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज शॉन मार्श आहे. त्याने २०१२ ते २०१९ दरम्यान १०२ सामने खेळले आहेत, तर चौथ्या क्रमांकावर जेपी ड्यूमिनी असून त्याने २०१४ ते २०१९ यादरम्यान खेळताना शून्यावर बाद न होता १०१ सामने खेळले आहेत.
टी२० क्रिकेट प्रकारात शून्यावर बाद न होता १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणार खेळाडू
१४५ सामने- ख्रिस गेल, २०१२ ते २०१६
१०६* सामने- दिनेश चंदिमल, २००९ ते आतापर्यंत
१०२ सामने- शॉन मार्श, २०१२ ते २०१९
१०१ सामने- जेपी ड्यूमिनी, २०१४ ते २०१९
१००* सामने- एमएस धोनी, २०१५ ते आतापर्यंत