आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी (२५ ऑक्टोबर) न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पैसा वसूल सामना पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभूत करून आलेल्या पाकिस्तान संघाने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाला देखील पराभूत केले. या सामन्यात पाकिस्तान संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात महत्वाची खेळी करणाऱ्या शोएब मलिकचे माजी भारतीय गोलंदाजाने तोंडभरून कौतुक केले आहे.
या सामन्यात पाकिस्तान संघाला विजयासाठी १३५ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून निर्णायक क्षणी शोएब मलिकने नाबाद २६ धावांची खेळी करत सामना पाकिस्तान संघाला जिंकून दिला. या विजयानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खानने शोएब मलिकचे तोंडभरून कौतुक केले आहे. क्रिकबज सोबत बोलताना झहीर म्हणाला की, “चाहत्यांना नेहमी प्रश्न पडतो की, शोएब मलिकसारखे वरिष्ठ खेळाडू अजूनही संघात का आहेत? ते याच कारणामुळे संघात आहेत. त्यांना चांगल माहीत आहे की, अशा परिस्थितीत दबाव कसा कमी करायचा. दबाव असताना, संयम ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्याला शेवटच्या क्षणी संघात स्थान देण्यात आले होते. त्याने आज निवडकर्त्यांना योग्य ठरवलं आहे.” ज्यावेळी पाकिस्तानचा संघ घोषित करण्यात आला होता, त्यामध्ये शोएब मलिकचा समावेश नव्हता. परंतु, शेवटच्या क्षणी सोहेब मकसूद दुखापतग्रस्त झाल्याने शोएब मलिकला संघात स्थान देण्यात आले.
तसेच बाबर आझमबाबत बोलताना झहीर म्हणाला की, “बाबर आझम शांत आणि संयमी आहे. पूर्वी आम्ही म्हणायचो की पाकिस्तान एक अप्रत्याशित संघ आहे, परंतु मला असे वाटते की बाबर आझम आता पाकिस्तान क्रिकेटला एक नवीन दिशा दाखवत आहे.”
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डॅरिल मिशेलने २७ आणि डेवोन कॉनवेने देखील २७ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ८ बाद १३४ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ३३ आणि आसिफ अलीने नाबाद २७ आणि शोएब मलिकने नाबाद २६ धावांची खेळी करत पाकिस्तान संघाला हा सामना ५ गडी राखून जिंकून दिला.