बांगालादेश विरुद्ध विंडीज संघात आज(17 डिसेंबर) पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात विंडीजने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. विंडीजकडून शाय होपने आक्रमक अर्धशतक करत विंडीजच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे.
बांगलादेशने विंडीजसमोर विजयासाठी 130 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा सलामीवीर होपने 23 चेंडूत 55 धावांची खेळी केली. त्याने त्याचे अर्धशतक केवळ 16 चेंडूत पूर्ण केले आहे.
त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. हा विश्वविक्रम भारताचा अष्टपैलू युवराज सिंगच्या नावावर आहे. युवराजने 2007 मध्ये टी20 विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.
तसेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कॉलीन मुनरो असून त्याने 2016ला श्रीलंके विरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक केले होते.
होपने त्याच्या या तुफानी खेळीत 6 षटकार आणि 3 चौकार मारले आहेत. त्याला महमुद्दलाहने 8 व्या षटकात 55 धावांवर बाद केले. पण तोपर्यंत विंडीजचा संघ विजयाच्या समीप पोहचला होता.
होप बाद झाल्यानंतर निकोलास पूरन आणि किमो पॉल यांनी 32 धावांची नाबाद भागीदारी करत 130 धावांचे आव्हान 11 व्या षटकातच पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या:
–एकीकडे टीम इंडिया धावांसाठी झगडत असताना हार्दिक पंड्या रणजी ट्राॅफीत धडका सुरुच
–पंजाबच्या ‘ज्यूनियर युवराज’ने द्विशतक करत केली या मोसमातील सर्वोत्तम खेळी
–आयपीएल लिलावाच्या एक दिवसाआधीच युवराज सिंगची दमदार अष्टपैलू कामगिरी