दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी टी20 मालिकेतील विजय विशेष असल्याचं म्हटलं आहे. जोहान्सबर्ग येथे शुक्रवारी झालेल्या मालिकेतील चौथ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं 135 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांची मालिका 3-1 ने खिशात घातली. या मालिकेत फलंदाजीत तिलक वर्मा आणि संजू सॅमसन, तर गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती यांनी प्रभावी कामगिरी केली.
लक्ष्मण यांनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटलं, “आमच्या खेळाडूंनी संपूर्ण मालिकेत ज्या प्रकारे खेळ केला त्याबद्दल मला त्यांचा खरोखर अभिमान आहे. 3-1 ने मालिका जिंकणे विशेष आहे. सूर्यकुमार यादवनं उत्कृष्ट नेतृत्व केलं. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी फलंदाजीत अद्भुत कामगिरी केली. गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीची कामगिरी अपवादात्मक होती. संपूर्ण संघानं उत्तम कामगिरी करत एकमेकांच्या यशाचा आनंद घेतला. मला या खेळाडूंचा अभिमान आहे. या संस्मरणीय विजयाबद्दल अभिनंदन.”
कर्णधार सूर्यकुमारनंही हा मालिक विजय खास असल्याचं म्हटलं आहे. ड्रेसिंग रुममध्ये आपल्या संघसहकाऱ्यांना संबोधित करताना तो म्हणाला, “सर्वांचं अभिनंदन. परदेशात मालिका जिंकणं किती कठीण असतं हे सर्वांनाच माहीत आहे. प्रत्येक खेळाडूनं आपली भूमिका चोख बजावली. याचं श्रेय प्रत्येक खेळाडूला जातं. एक संघ म्हणून आम्ही ही मालिका जिंकली आहे”.
सूर्यकुमार पुढे बोलताना म्हणाला, “हा विजय विशेष आहे. या विजयामुळे प्रत्येकजण आनंदी आहे. आम्हाला इथे खूप काही शिकायला मिळालं, जे भविष्यात उपयोगी पडेल. आता देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा.”
टीम इंडियानं मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेनं दुसरा सामना जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली. अखेर भारतानं तिसरा आणि चौथा सामना जिंकून मालिका 3-1 ने खिशात घातली.
हेही वाचा –
भारतीय संघ अडचणीत! पहिल्या कसोटीपूर्वी आणखी एक मोठा फलंदाज जखमी
“पुढचा धोनी कोण हे आधीच सांगितलं होतं..”, संजूच्या शतकानंतर शशी थरूर यांची 15 वर्ष जुनी पोस्ट व्हायरल
ऋतुराज गायकवाडनं भारतीय गोलंदाजांनाच धुतलं! पहिल्या कसोटीपूर्वी फलंदाजीनं खळबळ