इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ५१ वा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. मंगळवार रोजी (०५ ऑक्टोबर) शारजाहच्या मैदानावर हा सामना खेळला जाईल. उभय संघ या हंगामात दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडतील. यापूर्वी दिल्ली येथे मुंबई आणि राजस्थान संघ आमने सामने आले होते. हा सामना मुंबईने ७ विकेट्सने जिंकला होता.
आतापर्यंत रोहित शर्मा आणि संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील या संघांची एकमेकांविरुद्धची कामगिरी जवळपास बरोबरीची राहिली आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २६ सामने झाले असून त्यापैकी मुंबईने १३ सामने जिंकले आहेत. तर १२ सामन्यात राजस्थानचा विजय झाला आहे. उभयंतांमधील फक्त एकच सामना अनिर्णीत राहिला आहे.
मुंबई आणि राजस्थानमधील मागील १० सामन्यांविषयी बोलायचे झाल्यास, राजस्थानने मुंबईवर निर्विवाद वर्चस्व गाजवल्याचे दिसते. राजस्थानने या १० पैकी ६ सामने जिंकले आहेत. तर मुंबईला फक्त ४ सामने जिंकण्यात यश आले आहे.
दोन्ही संघांना आयपीएल २०२१ च्या प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी हा सामना खेळावा लागणार आहे. त्यांना उर्वरीत दोन सामने जिंकण्यासोबत नेट रन रेट चांगली ठेवण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे. दोन्ही संघांचे गुण सध्या समान असून राजस्थानचा नेट रन रेट -०.३३७ आहे. तर मुंबईचा नेट रन रेट -०.४५३ आहे आणि म्हणूनच हा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.
पण जिंकणाऱ्या संघांसाठी देखील पुढचा मार्ग सोपा नसेल. कारण, कोलकाता नाईट रायडर्स पुढील सामन्यात जिंकल्यास ते १४ गुणांसह मुंबई, पंजाब आणि राजस्थानमधील अंतर वाढवतील आणि प्लेऑफमधील चौथा संघ बनण्याच्या जवळ पोहोचतील. त्यातही त्यांचा रन रेट +०.२९४ असल्याने त्यांच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या शक्यता दुप्पटीने वाढतील. असे झाल्यास मुंबईचे आव्हान अजूनच कठीण बनेल आणि त्यांना दोन्ही सामने २०० धावांच्या फरकाने जिंकावे लागतील. तरच हा गतविजेता संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकेल.
इतकेच नव्हे तर, रोहितच्या संघाला पात्र ठरण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे. कारण राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यावर त्यांच्या प्लेऑफच्या आशा इतर संघांवर निर्भर राहतील. तांत्रिक दृष्ट्या बोलायचे झाल्यास, मुंबईने हा सामना गमावल्यानंतर त्यांना पंजाब आणि राजस्थानच्या त्यांच्या शिल्लक सामन्यांमध्ये पराभूत होण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. जर त्यांचा उर्वरित सर्व सामन्यांमध्ये पराभव झाल्यास मुंबईला संधी मिळण्याची थोडीफार शक्यता आहे. मात्र आजच्या सामन्यामध्ये एकच विजेता ठरणार असल्याने मुंबई किंवा राजस्थान यांच्यापैकी एकच संघ या सामन्यानंतर प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
चुरशीच्या लढतीनंतरही पराभूत झाल्याने सीएसकेच्या ताफ्यात निराशेची लहर, धोनी अन् रैनाची पत्नी तर…






