सनरायझर्स हैदराबादचा विस्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेननं आयपीएल 2024 पुन्हा एकदा आपल्या तुफानी फलंदाजीनं विरोधी गोलंदाजांची पळता भूई केली. त्यानं सोमवारी (15 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध धमाकेदार अर्धशतक झळकावलं. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर क्लासेननं 31 चेंडूत 67 धावा ठोकल्या. आपल्या या खेळीत त्यानं 2 चौकार आणि 7 दमदार षटकार लगावले. चालू हंगामातील क्लासेनची ही तिसरी अर्धशतकी खेळी आहे.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या क्लासेननं पहिल्या सहा चेंडूंमध्ये संयम दाखवला. यानंतर त्यानं आक्रमक पवित्रा स्वीकारला. क्लासेननं अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानं 15 व्या षटकात विजयकुमार वैशाखविरुद्ध षटकार ठोकत 50 धावा पूर्ण केल्या. हैदराबादसाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा तो संयुक्त पाचवा खेळाडू आहे. क्लासेनचं आयपीएलमधील हे पाचवं अर्धशतक आहे.
क्लासेन डावाच्या 17व्या षटकात बाद झाला. लॉकी फर्ग्युसननं त्याची विकेट घेतली. फर्ग्युसननं ऑफ स्टंपच्या बाहेर पूर्ण टॉस टाकला, ज्यावर क्लासेननं शॉर्ट थर्डच्या वरून शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅटचा नीट संपर्क न झाल्यानं वैशाखनं त्याचा झेल घेतला. क्लासेन पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा हैदराबादची धावसंख्या 231 होती. त्यानं ट्रॅव्हिस हेड (41 चेंडूत 102 धावा) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 57 धावा आणि एडन मार्करम (17 चेंडूत नाबाद 32) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागिदारी केली.
हैदराबादनं निर्धारित 20 षटकात 287/3 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. हैदराबादनं स्वतःचा विक्रम मोडला, जो त्यांनी 27 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध केला होता. तेव्हा हैदराबादनं 277 धावा रचल्या होत्या. यासह सनरायझर्स हैदराबादनं टी20 क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या रचली आहे.
टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या
314/3 नेपाळ वि मंगोलिया, हांगझोऊ 2023
287/3 सनरायझर्स हैदराबाद वि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, बंगळुरू 2024
278/3 अफगाणिस्तान वि आयर्लंड, डेहराडून 2019
278/4 चेक रिपब्लिक विरुद्ध तुर्की, इफ्लोव्ह 2019
277/3 सनरायझर्स हैदराबाद वि मुंबई इंडियन्स, हैदराबाद 2024
महत्त्वाच्या बातम्या –
ट्रॅव्हिस हेडच्या अंगात आलं! अवघ्या 39 चेंडूत ठोकलं शतक, सगळे विक्रम मोडले
हार्दिक नाही तर रोहित शर्मामुळे मुंबई हरली? शतकासाठी ‘हिटमॅन’ संथ खेळला? कसं ते समजून घ्या