रविवारी, (14 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्डेडियमवर ब्लॉकबस्टर सामना झाला. या सामन्यात चेन्नईनं 20 धावांनी शानदार विजय मिळवला.
चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 206 धावा केल्या होत्या. मात्र मुंबई जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आली तेव्हा रोहित शर्माच्या शतकानंतरही संघ लक्ष्य गाठू शकला नाही. रोहित शर्मानं या सामन्यात 63 चेंडूत 105 धावांची नाबाद खेळी केली, ज्यासाठी अनेक लोक त्याला ‘हिरो’ म्हणत आहेत. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या 6 चेंडूत केवळ 2 धावा करून बाद झाला. मुंबईच्या या पराभवासाठी चाहते हार्दिकला जबाबदार धरत आहेत. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं खरं कारण हार्दिक पांड्या नसून रोहित शर्मा आहे. हे कसं ते आम्ही तुम्हाला समजावून सांगतो.
12व्या षटकापर्यंत मुंबई इंडियन्सची धावसंख्या 2 बाद 118 धावा होती. त्यावेळी रोहित शर्मा 43 चेंडूत 74 धावा करून खेळत होता. संघाला शेवटच्या 8 षटकात 89 धावा करायच्या होत्या. मुंबईच्या तेव्हा 8 विकेट शिल्लक होत्या. त्यामुळे इथून रोहित शर्मानं आक्रमक फलंदाजी करायला हवी होती. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली मानली जाते. तसेच रोहित 43 चेंडूत 74 धावा करून सेट झाला असल्यानं पुढच्या षटकांमध्ये त्याच्याकडून धुवांधार फलंदाजीची अपेक्षा होती. असं असतानाही त्याला त्याच्या डावातील शेवटच्या 20 चेंडूत केवळ 31 धावाच करता आल्या.
रोहितनं आपल्या डावातील शेवटच्या 6 चेंडूत 17 धावा केल्या, मात्र जेव्हा गरज होती तेव्हा त्याची बॅट शांतच राहिली. 13व्या षटकापासून ते 18व्या षटकापर्यंत रोहितला धावा काढणं फार कठीण जात होतं. या 6 षटकांत त्याला एकही षटकार मारता आला नाही. रोहितच्या या संथ फलंदाजीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला. त्यामुळेच दुसऱ्या टोकाकडून सातत्यानं विकेट पडत गेल्या. रोहितनं शेवटच्या 2 षटकांमध्ये वेगानं फलंदाजी केली, मात्र तेव्हा संघाला शेवटच्या 12 चेंडूत 47 धावांची गरज होती, जे त्यावेळी अशक्यप्राय होतं. त्यामुळे मुंबईच्या पराभवासाठी रोहित शर्माची मधल्या षटकांमधील संथ फलंदाजी काही प्रमाणात जबाबदार होती, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
“तो पूर्णपणे तंदुरुस्त वाटत नाही”, हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर गिलख्रिस्टनं उपस्थित केले प्रश्न
“हार्दिक पांड्याचं नेतृत्व अन् गोलंदाजी दोन्ही अगदी सामान्य”, सुनील गावसकरांची जोरदार टीका