कॅनबेरा। बुधवारी(२ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मनुका ओव्हल मैदानात वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर त्याने खास विक्रमही केला आहे.
रवींद्र जडेजा या सामन्यात ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याने ५० चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६६ धावा केल्या. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सामन्यात ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च धावांची खेळी करणारा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला आहे.
त्याने हेमांग बदानी यांचा नाबाद ६० धावांचा विक्रम मागे टाकला आहे. बदानी यांनी ऑस्ट्रेलियामध्ये ७ व्या क्रमांकावर खेळताना वनडेत नाबाद ६० धावांची सर्वोच्च खेळी केली होती.
वनडेत ऑस्ट्रेलियामध्ये ७ व्या क्रमांकावर सर्वोच्च खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर माजी दिग्गज अष्टपैलू कपिल देव आहेत. त्यांनी १९८० ला ऑस्ट्रेलियामध्ये ७ व्या क्रमांकावर ७५ धावांची खेळी केली होती.
जडेजाने बुधवारी अर्धशतकी खेळी करण्याबरोबरच हार्दिक पंड्यासह सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारीही केली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३०२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला ३०३ धावांचे आव्हान दिले.
वनडेत ऑस्ट्रेलियामध्ये ७ व्या क्रमांकावर सर्वोच्च धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू –
७५ धावा – कपिल देव (१९८०)
नाबाद ६६ धावा – रवींद्र जडेजा (२०२०)
नाबाद ६० धावा – हेमांग बदानी (२००४)
५१ धावा – रॉबिन उथप्पा (२००८)
४९ धावा – रवि शास्त्री (१९८६)
महत्त्वाच्या बातम्या –
विराटने १२ हजार धावांचा टप्पा तर पार केला, पण आता लक्ष सचिनच्या ‘या’ विक्रमावर
दोन दुर्दैवी फलंदाज जे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ९९ धावांवर राहिले नाबाद
मागील ४ वर्षात या भारतीय क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियामध्ये केले वनडे पदार्पण