आयसीसीने प्रथमच आयोजित केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान एजबॅस्टन येथे १८ ते २२ जून या कालावधीत खेळला जाईल. स्पर्धेच्या अंतिम गुणतालिकेनुसार भारतीय संघ क्रमवारीत अव्वलस्थानी तर, न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला. याचबरोबर उभय संघांनी या अंतिम सामन्यासाठी आपली जागा निश्चित केली. आज आपण याच चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावांच्या तीन भारतीय भागीदाऱ्यांविषयी जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे या तिन्ही भागीदाऱ्या एकाच मालिकेत झाल्या होत्या.
१) रोहित शर्मा व मयंक अगरवाल (३१७ वि दक्षिण आफ्रिका, २०१९)
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा विक्रम भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा व मयंक अगरवाल यांच्या नावे जमा आहे. २०१९ मध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या विशाखापट्टणम कसोटीत दोघांनी पहिल्या गड्यासाठी ४९४ चेंडूंमध्ये ३१७ धावांची भागीदारी रचलेली. या डावात मयंक अगरवालने १३७ तर रोहितने १७६ धावांचे योगदान दिले होते. रोहित बाद झाल्यानंतर मयंकने वैयक्तिक द्विशतक साजरे केलेले.
२) रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे (२६७ वि दक्षिण आफ्रिका, २०१९)
या यादीमध्ये रोहित शर्माचा पुन्हा एकदा समावेश झाला असून, त्याचा साथीदार दुसरा मुंबईकर व भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आहे. या जोडीने २०१९ च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रांची येथील कसोटीत चौथ्या गड्यासाठी २६७ धावा जोडल्या होत्या. यात रोहित शर्माचे दीडशतकी तर अजिंक्य रहाणेचे ११५ धावांचे योगदान होते. रोहितने या डावात द्विशतक ठोकले होते.
३) विराट कोहली व रवींद्र जडेजा (२२५ वि दक्षिण आफ्रिका, २०१९)
भारताकडून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वोच्च भागीदारीच्या तिसऱ्या क्रमांकावर भारतीय कर्णधार विराट कोहली व अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्या भागीदारीचा क्रमांक लागतो. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्याच मालिकेतील पुणे येथील दुसऱ्या कसोटीत कोहली व जडेजा यांनी पाचव्या गड्यासाठी २२५ धावांची भागीदारी केली. विराटने १३२ तर जडेजाने ९१ धावांचे योगदान दिले होते. या भागीदारी दरम्यान विराटने २५४ धावांची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हे’ आहे एबीचे पुनरागमन न करण्याचे कारण, वाचून वाटेल अभिमान
“तेव्हाच मला संसर्ग झाल्याचे कळाले होते”, मायकेल हसीने शेअर केला कोरोनाचा अनुभव