आयपीएलचा १३ हंगाम सध्या संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होत आहे. यातील सहावा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केले होते.
यष्टीरक्षक फलंदाजाची सर्वोत्तम खेळी
या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने शानदार शतक झळकावले. त्याने ६९ चेंडूंचा सामना करताना तडाखेबंद नाबाद १३२ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ षटकार व १४ चौकारांचा वर्षाव केला. यष्टीरक्षक फलंदाजाने आयपीएलमध्ये केलेली ही सर्वोत्तम खेळी ठरली आहे.
मोडला रिषभ पंतचा विक्रम
यापुर्वी आयपीएलमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतने १२८ धावा केल्या होत्या. वृद्धीमान सहा ११५ धावांसह या यादीत तिसरा तर जॉनी बेअरस्ट्रो ११४ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. ऍडम गिलख्रिस्टने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून १०९ तर क्विटंन डिकॉकने १०८ धावा केल्या आहेत.
केएल राहुलच्या नावावर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून २ शतके
केएल राहुलने आयपीएलमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून तब्बल २ शतके झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच यष्टीरक्षक ठरला आहे. राहुलने गुरुवारी १३२ धावा केल्या तर यापुर्वी त्याने एकदा १०० धावांची खेळी केली होती.