20 संघांपासून सुरू झालेला टी-20 (icc T20 international world cup 2026) विश्वचषकाचा प्रवास आता महत्त्वाच्या वळणावर आला असून, स्पर्धेत आता केवळ 8 बलाढ्य संघ शिल्लक राहिले आहेत. ‘सुपर 8’ फेरीमध्ये पोहोचलेल्या सर्वच संघांवर उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी मोठा दबाव असेल. या फेरीत चांगली कामगिरी करणाऱ्या संघांनाच पुढील फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे. 8 संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक संघाला आपल्या गटात प्रत्येकी 3 सामने खेळावे लागणार आहेत.
या फेरीतील प्रत्येक सामन्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जो संघ आपल्या गटात पहिल्या दोन क्रमांकावर (Top 2) राहील, तोच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. जर एखाद्या संघाने आपले तिन्ही सामने जिंकले, तर त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान थेट निश्चित होईल. मात्र, एखादा सामना गमावल्यास त्या संघाचे भवितव्य ‘नेट रन रेट’वर अवलंबून असेल. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक धाव आणि प्रत्येक विकेट निर्णायक ठरणार आहे.
भारतीय संघाचा समावेश असलेल्या गटात दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांसारख्या आव्हानात्मक संघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटात पाकिस्तानसमोर न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका या संघांचे तगडे आव्हान असणार आहे. दोन्ही गटांतील ही लढत अत्यंत चुरशीची होणार असून, कोणता संघ बाजी मारून उपांत्य फेरीत धडक देतो, याकडे आता जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.






