पंजाब किंग्स संघाने आयपीएल २०२२च्या तिसऱ्या सामन्यात रविवारी (२७ मार्च) डी. वाय. पाटील स्टेडिअम येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. बेंगलोर संघाने दिलेले धावांचे आव्हान पाहता पंजाबला हा सामना जिंकणे कठीण जाईल असे वाटत होते. मात्र, पंजाबच्या फलंदाजांनी जोरदार प्रत्युत्तर देत बेंगलोर संघाच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी करून टाकली. हा विजय मिळवत पंजाब संघाने एका खास विक्रमाला गवसणी घातली.
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने निर्धारित २० षटकात २ विकेट्स गमावत २०५ धावा केल्या आणि २०६ धावांचे आव्हान पंजाबपुढे ठेवले. भले-मोठे आव्हान मिळालेले असूनही पंजाबच्या फलंदाजांनी आपल्या कर्णधाराने घेतलेला निर्णय सार्थ करून दाखवला. पंजाबने हे आव्हान १ षटक शिल्लक ठेवत पूर्ण केले आणि सामना खिशात घातला. त्यांचा हा या स्पर्धेतील पहिलाच सामना आणि पहिलाच विजय होता.
या विजयासह पंजाबने आयपीएल इतिहासात सर्वाधिकवेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना सामन्यात विजय मिळवण्याचा कारनामा केला. हा कारनामा पंजाबने आतापर्यंत ४वेळा केला आहे. यापूर्वी पंजाब किंग्सने (Punjab Kings) सर्वप्रथम २०१० साली कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाविरुद्ध खेळताना कोलकाता येथे २०१ धावांचा यशस्वी पाठलाग करत सामना खिशात घातला होता. त्यानंतर त्यांनी २०१४ साली अबू धाबी येथे चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) खेळताना २०६ धावांचा पाठलाग करत विजय मिळवला होता. पुढे २०१४ सालीच त्यांनी हैदराबाद येथे सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाविरुद्ध खेळताना २०६ धावांचा पाठलाग करत सामन्यावर आपले नाव कोरले होते.
आयपीएल इतिहासात तब्बल ४ वेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना विजय मिळवणारा पंजाब किंग्स हा आयपीएलमध्ये एकमेव संघ आहे.
आयपीएल इतिहासात २००+ धावांचा पाठलाग करताना विजय मिळवणारा पंजाब एकमेव संघ
२०१ धावा (विरुद्ध, कोलकाता नाईट रायडर्स, २०१०)
२०६ धावा (विरुद्ध, चेन्नई सुपर किंग्स, २०१४)
२०६ धावा (विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१४)
२०६ धावा (विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०२२)*
महत्त्वाच्या बातम्या-
हे ‘स्लो ओव्हर रेट’ म्हणजे काय रे भावड्या? भल्याभल्या संघनायकांनाही याच्या भितीने फुटतोय घाम
नाद नाद नादच! आता रोहित अन् धोनीसह ‘या’ यादीत विराटचेही घेतले जाणार नाव; पाहा काय केलाय कारनामा