भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2021) रविवारी (२६ डिसेंबर) समाप्त झाली. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) संघाने व्हीजेडी मेथड (VJD Method) नियमानुसार तमिळनाडू (Tamilnadu) संघाला ११ धावांनी पराभूत करत, प्रथमच या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. कोणत्याही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील हे हिमाचल प्रदेशचे पहिले जेतेपद आहे.
असा रंगला सामना
यापूर्वीच अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास असलेल्या हिमाचल प्रदेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी तमिळनाडूचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद केले. मात्र, यानंतर अनुभवी दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) व बाबा इंद्रजीत ही जोडी जमली. त्यांनी हिमाचल प्रदेशच्या सर्व गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. कार्तिकने तुफानी ११७ धावांची खेळी केली. तर, दुसऱ्या बाजूला इंद्रजीत याने ८० धावा बनविल्या. शाहरुख खान (Shahrukh Khan) याने २१ चेंडूत ४२ धावा करून संघाला ३१४ धावांपर्यंत मजल मारून दिली. हिमाचल प्रदेशसाठी पंकज जसवाल याने चार तर कर्णधार रिषी धवनने (Rishi Dhawan) ३ बळी मिळवले.
फलंदाजांनी दाखविला दम
तमिळनाडूकडून मिळालेल्या ३१५ धावांच्या आव्हानासमोर सलामीवीर प्रशांत चोप्रा व शुभम अरोरा यांनी ६१ धावांची सलामी दिली. त्यानंतर संघाने झटपट तीन बळी गमावले. मात्र, अरोरा याने एक बाजू लावून धरत शानदार शतक झळकावले. त्याला अमित कुमार याने ७४ धावा काढत चांगली साथ दिली. अमित बाद झाल्यानंतर कर्णधार रिषी धवनने अष्टपैलू खेळ दाखवत नाबाद ४२ धावा बनविल्या. विजयासाठी १६ धावा शिल्लक असताना खराब सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. तेव्हा पंचांनी हिमाचल प्रदेशला व्हीजेडी मेथडनुसार ११ धावांनी विजयी घोषित केले. शुभम अरोरा याला शानदार नाबाद शतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-