भारतीय संघाने बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर अफगाणिस्तानला 8 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. तसेच, विश्वचषकातील सलग दुसरा सामनाही खिशात घातला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याच्या बॅटमधून विश्वविक्रमी शतक निघाले. या सामन्यात त्याने 84 चेंडूत 131 धावांची झंझावाती शतकी खेळी साकारली. यामध्ये 5 षटकार आणि तब्बल 16 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या एकाच शतकाने 7 विक्रम रचले गेले. तो विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारा फलंदाजही बनला. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्याच नावे झाला. अशात या खेळीनंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया सर्वांच्या भुवया उंचावत आहे.
काय म्हणाला रोहित?
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याने शतकी खेळी केल्यानंतर मन जिंकणारे विधान केले. तो म्हणाला की, तो विक्रमाविषयी जास्त विचार करत नाही. कारण, त्याला माहिती आहे की, अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. सामनावीर रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. स्वाभाविक खेळ खेळण्यासाठी मी स्वत:चे समर्थन करत होतो. मला माहिती होते की, एकदा मी जेव्हा सेट होईल, तेव्हा खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी होईल. विश्वचषकात शतक करणे खास असते. त्यामुळे मी खूपच खुश आहे.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला, “मला विक्रमाविषयी जास्त विचार करायचा नाहीये. कारण, मला माहिती आहे की, अजून खूप पुढे जायचे आहे. त्यामुळे मला माझी एकाग्रता गमवायची नाहीये. मला माहितीये की, संघाला चांगली सुरुवात करून देणे आणि शक्य तितक्या चांगल्या स्थितीत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे. हे असे आहे, जे मी काही काळापासून केले आहे आणि हे मला आवडते. जेव्हा हे काम करतो, तेव्हा चांगले वाटते.”
पुढील आव्हान पाकिस्तानचे
या सामन्यात अफगाणिस्तानने भारतीय संघाला 273 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारतीय संघाने 35 षटकात 2 विकेट्स गमावत पार केले. भारताकडून या सामन्यात रोहितव्यतिरिक्त (137) विराट कोहली (नाबाद 55) यानेही अर्धशतक साकारले. त्याच्याव्यतिरिक्त ईशान किशन याने 47, तर श्रेयस अय्यर याने नाबाद 25 धावा केल्या. आता भारताला पुढील सामन्यात 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचा सामना करायचा आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याची संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे. (hitman rohit sharma statement after match winning century india vs afghanistan world cup 2023)
हेही वाचा-
तूच खरा हिरो! आधी स्मिथ अन् आता नवीनसाठी उभा ठाकला विराट, दाखवली असामान्य खिलाडूवृत्ती
बाहशाह बुमराह! वर्ल्डकपमधील दर्जा कामगिरी सुरूच, असा आहे आजवरचा रेकॉर्ड