---Advertisement---

टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्शदीप सिंगला ‘ती’ चूक पडली महागात; आयसीसीने ठोठावला मोठा दंड

On: मंगळवार, मार्च 10, 2026 5:38 PM
---Advertisement---

टीम इंडियाने फायनलमध्ये न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे जेतेपद पटकावले आहे. मात्र, भारतीय स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला फायनलमध्ये न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेलला चेंडू मारणे चांगलेच महाग पडले आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (ICC) या प्रकरणात कडक कारवाई करत अर्शदीपवर मोठा दंड ठोठावला आहे. आयसीसीने त्याला आचारसंहितेच्या लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली आहे.

खरे तर, अर्शदीप सिंग आणि डॅरिल मिचेल यांच्यातील हा वाद फायनलमध्ये न्यूझीलंडच्या डावातील ११ व्या षटकादरम्यान पाहायला मिळाला. डॅरिल मिचेलने अर्शदीपच्या चेंडूंवर दोन षटकार ठोकले होते. दरम्यान, षटकाच्या पाचव्या चेंडूवर मिचेलने समोरच्या बाजूला शॉट खेळला आणि चेंडू अर्शदीपच्या हातात आला. फॉलो-थ्रूमध्ये अर्शदीपने चेंडू विकेटच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थेट मिचेलच्या मांडीला जाऊन लागला.

यामुळे मिचेल प्रचंड संतापला आणि आक्रमक पवित्र्यात अर्शदीपच्या दिशेने चालत जाऊन हाताने इशारे करू लागला. त्यानंतर पंच आणि सूर्यकुमार यादव यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. यावेळी पंचांनीही अर्शदीपशी चर्चा करून त्याला ताकीद दिली. यामुळे मैदानावर काही काळ बाचाबाची पाहायला मिळाली. तरीही, षटक संपल्यानंतर अर्शदीपने मिचेलची माफी मागितली होती.

या घटनेवर आता आयसीसीने कारवाई करत अर्शदीप सिंगच्या मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावला आहे. त्याला आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल-१ च्या उल्लंघनासाठी दोषी धरण्यात आले आहे. अर्शदीपला आयसीसीच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी बनवलेल्या कोड ऑफ कंडक्टच्या ‘आर्टिकल २.९’ चे उल्लंघन केल्याबद्दल ही शिक्षा देण्यात आली. हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडूच्या दिशेने किंवा त्याच्याजवळ चुकीच्या किंवा धोकादायक पद्धतीने चेंडू किंवा क्रिकेटशी संबंधित कोणतीही वस्तू फेकण्याशी संबंधित आहे.

दंडासोबतच अर्शदीप सिंगच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक ‘डिमेरिट पॉइंट’ देखील जोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या २४ महिन्यांतील हा त्याचा पहिलाच डिमेरिट पॉइंट आहे. हा पॉइंट पुढील २४ महिन्यांपर्यंत सक्रिय राहील. नियमांनुसार, ४ डिमेरिट पॉइंट झाल्यास खेळाडूवर बंदी (बॅन) घातली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---