भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात फ्रान्सने आज (6डिसेंबर) बलाढ्य अर्जेंटिनाला 5-3 असे पराभूत करत धक्कादायक निकालाची नोंद केली आहे.
या सामन्यात फ्रान्सकडून ह्यूगो जेनस्टेट, चार्लेट विक्टर, कोसिने एरिस्टाइड, बामगर्टन गॅस्पर्ड, गोएत फ्रान्कोइस तर अर्जेंटिनाकडून मार्टीनेझ लुकासने एक आणि पेईलाट गोंझेलोने दोन गोल केले.
अर्जेंटिनाने सामन्याला आक्रमक सुरूवात करत 2ऱ्या मिनिटालाच पेनल्टी कॉर्नर मिळवली. मात्र त्यांना या संधीचा फायदा घेता आला नाही. पहिल्या सत्रात एकही गोल न झाल्याने दोन्ही संघांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले. यावेळी फ्रान्सला पहिला गोल करण्यापासून गोलकिपर विवाल्दी जुआनने अडवला.
18व्या मिनिटाला जेनस्टेटने गोल करत फ्रान्सला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाच मिनिटाच्या फरकाने कर्णधार विक्टरने पेनल्टी कॉर्नरवर फ्रान्सकडून दुसरा गोल केला. हा त्याचा या विश्वचषकातील दुसरा गोल ठरला.
2-0 असे आघाडीवर असलेल्या फ्रान्सने 28 वर्षानंतर या विश्वचषकात पुनरागमन करताना उत्तम खेळ केला आहे. त्यांना पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून 2-1 असा पराभव स्विकारावा लागला तरी दुसऱ्या सामन्यात त्यांनी जागतिक क्रमवारीत 8व्या स्थानावर असलेल्या स्पेनला 1-1 असे बरोबरीत रोखले होते.
आजच्या सामन्यातही फ्रान्सने त्यांचा खेळ उंचावत अर्जेंटिनाला चांगलीच टक्कर दिली. एरिस्टाइडने 26व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
मझील्ली ऑग्स्टीन आज अर्जेंटिनाकडून 200वा आतंरराष्ट्रीय सामना खेळत होता. पण या सामन्यात त्याला फार काही करता आले नाही. तसेच अर्जंटिना संघाने 2014च्या विश्वचषकात कांस्य पदक आणि रियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे.
न्यूझीलंड विरुद्ध विजयी गोल करणाऱ्या लुकासने या सामन्यात 28व्या मिनिटाला अर्जेंटिनाकडून पहिला गोल केला. त्यानंतर दोन मिनिटाच्या फरकाने गॅस्पर्डने फ्रान्ससाठी चौथा गोल केला.
दोन सत्रे पूर्ण झाल्यावर फ्रान्सकडे 4-1 अशी मोठी आघाडी होती. तिसऱ्या सत्रात अर्जेंटिनाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाल्या .यातील एक पेनल्टी कॉर्नरचा गोंझेलोने गोलमध्ये रूपांतर केल्याने अर्जेंटिना 2-4 असा मागेच होता.
चौथ्या सत्रात दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी आक्रमक खेळत होते. यावेळी 48व्या मिनिटाला गोंझेलोने या विश्वचषकातील त्याचा चौथा गोल करत संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र फ्रान्सच्या फ्रान्कोइसने गोल करत अर्जेंटिनासाठी विजयाचा मार्ग खडतर केला. सामना बरोबरीचा करण्यासाठी अर्जेंटिनाचे प्रयत्न फ्रान्सने अपयशी ठरवत सहज विजय मिळवला.
फ्रान्सने विश्वचषकात तिसऱ्यांदा अर्जेंटिना विरुद्ध विजय मिळवला आहे. तसेच त्यांच्या विजयाने स्पेन या स्पर्धेबाहेर पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: शेवटच्या सत्रात गोल करत न्यूझीलंडने स्पेनला रोखले बरोबरीत
–कसोटीमध्ये तब्बल ८२ वर्षानंतर घडला हा पराक्रम
–आयपीएल चाहत्यांना मोठा धक्का, २०१९च्या आयपीएलमध्ये दिसणार नाही ही ऑस्ट्रेलियाची स्फोटक जोडी