---Advertisement---

गुगलीवर जास्त विकेट्स घेतो म्हणून मला काढले टीम इंडियाबाहेर

On: शनिवार, जुलै 4, 2020 3:37 PM
---Advertisement---

गेली अनेक वर्ष भारतीय संघाबाहेर असलेला लेगस्पिनर पियुष चावलाने (Piyush Chawla) एक धक्कादायक खुलासा करत आपल्याला भारतीय संघाबाहेर काढण्याचे कारण सांगितले आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्यासोबत ‘चॅट शो’ मध्ये चावलाने अनेक घटनांचा उलगडा केला.

आकाश चोप्रा व पियुष चावला यांनी युट्युबवर आपल्या मुलाखतीचा भाग प्रदर्शित केला. आकाशने त्याला भारतीय संघाबाहेर जाण्याचे काय कारण वाटते असे विचारले असता चावला म्हणाला,” मी एका निवडकर्त्याशी या गोष्टीवर बोललो तेव्हा त्यांनी सांगितलेले कारण ऐकून मी आश्चर्यचकित झालो. त्यांनी मला सांगितले की, तू गुगलीवर (Googly) अधिक विकेट घेतो. त्यामुळे तुझी निवड होत नाही. मी हैराण होतो आणि मला हसू सुद्धा येत होते.”

पुढे बोलताना चावला म्हणाला, ” मी थोडावेळ थांबलो. मी असा व्यक्ती आहे की, मला गोष्टी मनात साठवून ठेवलेल्या आवडत नाहीत. त्यामुळे मी त्यांना जशास तसे उत्तर दिले.”

आपले उत्तर उदाहरणासह सांगताना चावला म्हणाला, “सचिन पाजी जर आपल्या शतकातील ६० रन्स स्ट्रेट ड्राईव्हने (Straight Drive) करत असतील तर त्यांच्या शतकाचे मूल्य तर कमी होत नाही ना ? मी कशाही घेऊ, पण विकेट घेतो ना ? कदाचित, माझा हाच प्रतिप्रश्न त्यांना आवडला नाही.”

३१ वर्षीय चावलाने भारतासाठी ३ कसोटी, २५ वनडे आणि ७ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये अनुक्रमे ७, २२ आणि ४ बळी मिळविले आहेत. २०११ च्या विश्वविजेत्या संघाचा तो सदस्य होता. गेली नऊ वर्ष कोलकत्ता नाइट रायडर्ससाठी खेळल्यानंतर यावर्षीच्या आयपीएल लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्सने खरेदी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---