“सुरुवात मजबुरीतून केली होती, पण आता मजा येत आहे…”. ‘मिर्झापूर’ या प्रसिद्ध वेब सीरिजमधला हा डायलॉग तुम्ही नक्कीच ऐकला असेल. हा डायलॉग भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रावर अगदी चपखल बसतो. जर आपण नीरज चोप्राची कहाणी जाणून घेतली तर आपल्याला कळतं की त्यानं मजबुरीतून खेळायला सुरुवात केली होती. परंतु तो आता जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक बनला आहे.
हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खंडारा येथे जन्मलेला नीरज चोप्रा लहानपणी आज दिसतो तसा नव्हता. खरं तर, नीरज लहानपणी खूप लठ्ठ होता. नीरजच्या लठ्ठपणामुळे त्याची खूप चेष्टा केली जायची. लठ्ठपणा कमी करण्यासाठी नीरज धावायला लागला. वयाच्या 13व्या वर्षी नीरजचे काका सतीश कुमार चोप्रा त्याला धावण्यासाठी घरापासून 15 किलोमीटर दूर असलेल्या शिवाजी स्टेडियमवर घेऊन जायचे.
नीरजला धावण्यात फारसा रस नव्हता. परंतु त्यानं स्टेडियममध्ये खेळाडूंना भाला फेकताना पाहिलं आणि त्याला तो खेळ आवडला. अशाप्रकारे नीरजनं मजबुरीतून हा खेळ सुरू केला. हळूहळू तो या खेळाच्या प्रेमात पडला आणि आज तो जगातील प्रसिद्ध भालाफेकपटू बनला आहे.
2021 मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं इतिहास रचत सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्यानं 87.58 मीटर लांब भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा एकमेव खेळाडू होता. याशिवाय नीरजनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. आता या वेळी पॅरिसमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राकडून पुन्हा एकदा सुवर्णपदकाची अपेक्षा असेल.
पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. नुकत्याच झालेल्या काही स्पर्धांमध्ये त्यानं सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये त्याच्याकडून सुवर्णपदकाच्या आशा आणखी वाढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑलिम्पिकमध्ये दिल्या जाणाऱ्या सुवर्ण पदकामध्ये खरोखरच सोनं असतं का? जाणून घ्या कोणत्या धातूपासून बनलं जातं मेडल
ऑलिम्पिकमध्ये फक्त 5 रिंग का असतात? रिंगच्या रंगांचा अर्थ काय? सर्वकाही जाणून घ्या
कपिल देव यांचे प्रयत्न फळाला! कॅन्सरशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटूला बीसीसीआयकडून तातडीनं मदतीची घोषणा