चेन्नई। मंगळवारी(9 एप्रिल) आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाज दीपक चहरला देण्यात आला.
त्याने या सामन्यात 4 षटकात गोलंदाजी करताना 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यात त्याने ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा आणि नितीश राणा या कोलकताच्या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले.
चहरने आत्तापर्यंत आयपीएल 2019 मध्ये 6 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर तो यावर्षीच्या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक विकेट घेण्यात चौथ्या क्रमांकावर आहे. चहरने मंगळवारी झालेल्या सामन्यानंतर त्याच्या या यशामागील कारणाचा खूलासा केला आहे.
चहर म्हणाला, ‘मला माहित होते आम्ही चेन्नईमध्ये खूप सामने खेळणार आहे. त्यामुळे मी माझ्या स्लोअर बॉल आणि यॉर्करवर काम केले होते. मी धोनीबरोबर ड्रेसिंगरुममध्ये टेबल टेनिस खेळताना खूप वेळ घालवला आहे आणि मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळाले आहे. जेव्हा ब्रावो दुखापतग्रस्त झाला तेव्हा मला शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजीची संधी मिळाली.’
त्याचबरोबर 6 एप्रिलला किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध झालेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यात चहरने पंजाबला विजयासाठी 12 चेंडूत 39 धावा असताना सलग दोन नो बॉल टाकले होते. त्यावेळी धोनी चहरवर चिडला होता.
याबद्दल बोलताना चहर म्हणाला, ‘मला हा एक प्रश्न विचारणारे हजारो संदेश आले आहेत. मला वाटते धोनी चिडला होता. जर मी कर्णधार असतो, तर मी देखील चिडलो असतो. 12 चेंडूत 39 धावा असताना अचानक त्या दोन चेंडूमुळे 31 धावा असे समीकरण झाले. तो मी निवडलेल्या चेंडूंवर चिडला होता. माझी चेंडू टाकण्याची निवड चूकली होती.’
महत्त्वाच्या बातम्या –
–एमएस धोनीने केलेल्या स्टम्पिंगवर इम्रान ताहीरने असे केले सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ
–रोहितच्या अनुपस्थितीत हे खेळाडू करु शकतात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व
–‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलने चाहत्यांबरोबर असा साजरा केला विजयाचा आनंद, पहा व्हिडिओ






