गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अष्टपैलू कृणाल पांड्या याने अखेर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर आपले मौन सोडले आहे. या व्हिडिओमध्ये तो लखनऊ सुपर जायंट्सचा फलंदाज निकोलस पूरनची कॉलर पकडताना दिसत आहे. गुरुवारी (७ मे) आरसीबी आणि एलएसजी लखनऊच्या एकाना स्टेडियमवर समोरा-समोर आले. त्यामध्ये एलएसजीची फलंदाजी सुरू असताना कृणाल आणि निकोलस यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये निकोलस कृणालच्या दिशेने काही हावभाव करताना दिसत असून पुढील काही क्षणातच त्याची कॉलर पकडताना दिसत आहे.
झाले असे की सामन्यावेळी कृणालने निकोलसला एकापाठोपाठ दोन बाउन्सर टाकले होते. निकोलसने एकेरी धाव घेतली आणि नॉन-स्ट्रायकर एंडला पोहोचला असता दोघांमध्ये काही शाब्दिक चकमक झाली. तसेच सामन्यानंतर निकोलसने कृणालची कॉलर पकडली असून त्याला ढकलताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पुढे त्यामध्येच दोन्ही खेळाडू हसताना गप्पा मारताना दिसत आहे. यामुळे चाहते गोंधळले असून नेमके दोघांमध्ये काय घडले, यावरुन तर्कवितर्क लावणे सुरू झाले आहे. कृणालने एक पोस्ट करत याबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे. त्या पोस्टवर निकोलसनेही प्रतिक्रिया दिली आहे.
कृणालने निकोलससोबत एक फोटो शेयर केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “कोणताही वाद नाही. केवळ प्रेम. माझा भाऊ निकोलस पूरन, १०० आयपीएल सामने पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. तुझा अभिमान वाटतो, असेच अनेक सामने खेळत राहा. तसे तो बाउन्सर कसा होता?”
कृणालच्या या पोस्टवर निकोलसने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले, “मित्रांनो, इथे फक्त प्रेम आहे, माझ्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी एक.”
दोघांच्या बाउन्सरच्या घटनेबद्दल बोलायचे झाले, तर ही घटना निकोलस फलंदाजीला आला असता कृणालने एक सरळ बाउन्सर टाकला होता. निकोलसने पुढच्याच चेंडूवर एकेरी धाव घेतली. जेव्हा तो नॉन-स्ट्रायकर एंडला पोहोचला तेव्हा दोघांमध्ये काही शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर पुढे काही घडले नाही.
दोघे २०२३ आणि २०२४ च्या हंगामात एलएसजीकडून एकत्र खेळले आहेत. २०२३ मध्ये एलएसजी प्लेऑफमध्ये पोहोचला होता. २०२६ च्या हंगामाचे समीकरण पाहिले तर एलएसजी जवळपास प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. आरसीबी पहिल्या चारमध्ये असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत.
सामन्याचे पाहिले तर हा सामना एलएसजीने डकवर्थ लुईस स्टाईल पद्धतीनुसार ९ धावांनी जिंकला होता. या सामन्याची विशेष बाब म्हणजे एलएसजीच्या प्रिन्स यादवने विराट कोहलीला शून्यावर बाद केले.






