गोवा: हैदराबाद एफसीने बुधवारी (२३ फेब्रुवारी) विजय मिळवून ३५ गुणांसह इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) यंदाच्या पर्वात उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचा पहिला मान पटकावला. हैदराबादने २-१ अशा फरकाने केरला ब्लास्टर्सवर विजय मिळवला. केरलाने गोल करण्याच्या सर्वाधिक संधी निर्माण केल्या होत्या, परंतु हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मिकांत कट्टीमणी व अन्य बचावपटूंनी त्यांना यश मिळवू दिले नाही. हैदराबादकडून बार्थोलोमेव ऑग्बेचे (२८ मि.) व झेव्हियर सिव्हेरियो (८७ मि. ) यांनी प्रत्येकी एक गोल केला. केरलाकडून गोल करण्याचे १८ प्रयत्न झाले, परंतु त्यांना एकच गोल करता आला. ९०+५ मिनिटाला व्हिंसी बॅरेट्टोने अप्रतिम गोल करून केरलाचे खाते उघडले. तोपर्यंत सामना हातून निसटला होता.
मुंबई सिटी एफसीच्या विजयामुळे केरला ब्लास्टर्सला अव्वल चार स्थानातून बाहेर जावे लागले. त्यामुळे हैदराबाद एफसीविरुद्धच्या आजच्या लढतीत त्यांना विजय मिळवणे गरजेचा होता, पण त्यांच्याकडून तसा खेळ होताना दिसला नाही. एड्रीयन लुना आणि अल्व्हारो व्हॅझकेज यांच्याकडून त्या ताकदीने खेळ नाही झाला. अशात हैदराबाद एफसी सावध पवित्र्यातच खेळत होते, परंतु २८व्या मिनिटाला त्यांनी आक्रमण केला. रोहित दानूने बॉक्समध्ये हेडरने चेंडू बार्थोलोमेव ऑग्बेचेकडे सोपवला. गोल करण्यासारखी संधी नसतानाही ऑग्बेचेने कौशल्य दाखवताना केरला ब्लास्टर्सच्या तीन बचावपटू व गोलरक्षक प्रभसुखन गिल याला चकवून हैदराबादला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
३८व्या मिनिटाला केरला ब्लास्टर्सचे खेळाडू चेंडू पेनल्टी बॉक्समध्ये घेऊन जाणार तितक्याच आकाश मिश्राने सुरेख बचाव केला. पण, या प्रयत्नात आकाश दुखापतग्रस्त झाला, परंतु प्राथमिक उपचारानंतर तो पुन्हा खेळायला उतरला. ४१व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरवर केरलाने गोल केलाच होता, परंतु हैदराबादचा गोलरक्षक कट्टीमणीने अडवला. केरला सातत्याने कॉर्नर मिळवत होते, परंतु त्याचा फायदा उचलण्यात ते चुकले. हैदराबादचा बचाव सुरेख झाला आणि त्यामुळे हैदराबादने पहिल्या हाफमध्ये १-० अशी आघाडी कायम राखली.
४९व्या मिनिटाला केरलाला बरोबरीचा गोल करण्याची संधी चालून आली होती. चेंचो गिल्तशेन चेंडू घेऊन हैदराबादच्या ताफ्यात शिरला होता, वन ऑन वन परिस्थिती असताना गोलरक्षक कट्टीमणीने पुढे येऊन त्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर मिळालेल्या सलग तीन कॉर्नरवरही केरलाला गोल करता आला नाही. तिसऱ्या प्रयत्नात हरमन ज्योत खाब्राने हेडरद्वारे टोलावलेला चेंडू क्रॉसबारला लागून बाहेर गेला. हळुहळू खेळाचा वेग वाढताना दिसला अन् ५५व्या मिनिटाला व्हॅझकेजचा प्रयत्न कट्टीमणीने अडवला. ५९व्या मिनिटाला केरलाचा गोलरक्षक गिल याने भन्नाट बचाव केला. रोहित दानू व ऑग्बेचे यांचे ६ यार्डावरून गोलजाळीच्या दिशेने झालेले प्रयत्न गिलने अडवले. गिलच्या बचावाचे प्रतिस्पर्धी ऑग्बेचेने कौतुक केले.
६१व्या मिनिटाला चेंचोने गोल करण्याची सोपी संधी गमावली, परंतु कट्टीमणीचाही तितकाच सुरेख बचाव झाला. केरलाने पुन्हा एकदा बरोबरीची संधी गमावली. केरलाचे सारे प्रयत्न अपयशी ठरत होते. ७३व्या मिनिटाला व्हॅझकेजचा व्हॉलीद्वारे गोल करण्याचा प्रयत्न कट्टीमणीने हाणून पाडला. कट्टीमणीच्या समोर बरेच खेळाडू उभे होते, तरीही त्याने सुरेख बचाव केला. केरलाला सातत्याने अपयश येताना हैदराबादने ८७व्या मिनिटाला निखिल पुजारीच्या क्रॉसवर ६ यार्ड बॉक्समधून झेव्हियर सिव्हेरियोने हेडरद्वारे गोल केला. इथून केरलाला पुनरागमन करणे अवघड होते. ९०+५ मिनिटाला व्हिंसी बॅरेट्टोने अप्रतिम गोल करून केरलाचे खाते उघडले, परंतु निकाल हैदराबादच्याच बाजूने लागला.
निकाल- हैदराबाद एफसी २ (बार्थोलोमेव ऑग्बेचे २८ मि., झेव्हियर सिव्हेरियो ८७ मि. ) विजयी विरुद्ध केरला ब्लास्टर्स एफसी १ (व्हिंसी बॅरेट्टो ९०+५ मि.).
महत्वाच्या बातम्या-
मोहन बागानचे लक्ष्य ‘प्ले ऑफ’ फेरी निश्चितीचे; ओदिशाला देणार आव्हान
‘मी प्रत्येक सामना खेळू इच्छितो, पण आमच्याकडे पंत…’, इशानचे रिषभबरोबरील स्पर्धेबाबत मोठे भाष्य
आयपीएल २०२२ मधील तब्बल ७० सामने होणार मुंबई अन् पुण्यात? ‘या’ ४ स्टेडियमवर आयोजनाची शक्यता