गोवा| बंगलोर एफसीला पराभूत करणाऱ्या हैदराबाद एफसीसमोर हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) मध्ये सोमवारी नॉर्थ ईस्ट युनायटेडचे आव्हान असणार आहे. या सामन्यात हैदराबाद एफसीचे पारडे जड असून त्यांना विजय मिळवून अव्वल चौघांत स्थान पटकावण्याची संधी आहे.
गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असलेल्या हैदराबाद एफसीनं दक्षिण डर्बीत बंगलोर एफसीवर १-० असा विजय मिळवला तो बार्थोलोमेव ऑग्बेचे याच्या एकमेव गोलच्या जोरावर. मानोलो मार्क्यूझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हैदराबाद एफसीचा संघ संतुलित दिसत आहे आणि नॉर्थ ईस्ट युनायटेडविरूद्ध त्यांना मोठा विजय मिळवण्याची संधी आहे. नॉर्थ ईस्ट युनायटेडला मागील सामन्यात ओडिशा एफसीकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला आहे.
आकाश मिश्रा, आशिष राय, हितेश शर्मा आणि निखिल पूजारी यांचा खेळ दिवसेंदिवस बहरत चालला आहे आणि हैदराबादसाठी ही खूप चांगली बाब आहे. रोहित दानूच्या रुपानं मार्क्यूझ यांना आघाडीच्या फळीत एक सक्षम पर्याय मिळाला आहे. त्यामुळे ऑग्बेचेवरील वर्कलोड कमी होण्यास मदत मिळणार आहे. ऑग्बेचेनं हैदराबादसाठी सलग तीन सामन्यांत गोल केले आहेत आणि हैदराबादकडून सलग चार सामन्यांत गोल करणाऱ्या दुसऱ्या खेळाडू बनण्याची संधी आहे.
मानोलो मार्क्यूझ म्हणाले की, ”नॉर्थ ईस्ट इंडिया चांगल्या फॉर्मात नाही, या मताशी मी सहमत नाही. त्यांनी चांगला खेळ केलाय आणि ओडिशा एफसीविरुद्ध त्यांचा पराभव व्हायला नको होतो. त्यांच्याविरूद्धचा सामना आव्हानात्मक असणार आहे. या लीगमध्ये प्रत्येक संघ
एकमेकांना पराभूत करण्याची क्षमता राखतो. सलग तीन विजय आमच्यासाठी पुरेसे नाहीत. ही लीगची सुरूवात आहे. आयएसअलमधील मागील १६ सामन्यांत आम्ही केवळ एकच पराभव पत्करला आहे, परंतु नॉर्थ ईस्ट युनायटेड क्वालिटी संघ आहे. संघातील अनुभवी खेळाडूंनी त्यांची भूमिका पार पाडणे गरजेचे आहे.”
दरम्यान, नॉर्थ ईस्ट युनायटेडचा संघ गुणतालिकेत ४ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. हैदराबादच्या खात्यात चार सामन्यानंतर ७ गुण आहेत. खालिद जमिल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या नॉर्थ ईस्ट युनायटेडला पाच सामन्यांत एकच विजय मिळवता आलेला आहे. हेर्नान संताना, खास्सा चमारा आणि डेशॉर्न ब्राऊन यांची कामगिरी चांगली होतेय, परंतु फेडेरीको गॅलेगो दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे संघाची घडी बसवताना थोडी अचडण होतेय.
”खेळाडू कमबॅक करतील, याची मला खात्री आहे. आमचे खेळाडू मानसिकदृष्ट्या कणखर आहेत आणि मागील सामन्यांत ते आम्ही सिद्ध केलं आहे. बचावफळीत आमची शिस्तबद्ध कामगिरी होतेय, हैदराबाद त्याच बाबतीत कमकुवत दिसतेय,”असे नॉर्थ ईस्ट युनायटेडचे साहाय्यक प्रशिक्षक ऍलिसन खार्सिटीइव्ह यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल: एससी ईस्ट बंगालचे पहिल्या विजयाचे स्वप्न केरळा ब्लास्टर्समुळे भंगले
ईस्ट बंगालला हवीय नशीबाची साथ; केरळा ब्लास्टर्सविरुद्ध लागणार कसोटी
मेस्सीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, तब्बल सातव्यांदा पटकावला मानाचा ‘बॅलन डी’ओर’