हैदराबाद, २९ ऑक्टोबर : गतविजेत्या हैदराबाद एफसीने हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) मध्ये विजयी हॅटट्रिक साजरी केली. घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत हैदराबाने १-० अशा फरकाने एफसी गोवाचा पराभव केला. झेव्हियर सिव्हेरियोने ११व्या मिनिटाला केलेला गोल हैदराबादला ३ गुण मिळवून देण्यात निर्णायक ठरला. गोवा संघाने सामन्यात बरोबरी मिळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु हैदराबादने बचाव एवढा मजबूत केला होता की गोवाच्या आक्रमणपटूंना यश मिळाले नाही. अलव्हारो व्हॅझकेजला ८४ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करता आला नाही आणि गोवाने बरोबरीची सुवर्णसंधी गमावली. एफसी गोवाचा आयएसएलच्या या पर्वातील पहिलाच पराभव ठरला. यापूर्वीच्या दोन्ही लढती त्यांनी जिंकल्या होत्या. हैदराबादच्या आजच्या विजयात गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी नायक ठरला.
११ व्या मिनिटाला झेव्हियर सिव्हेरियोने एफसी गोवाच्या दोन बचावपटूंसह गोलरक्षक अर्शदीप सिंगला चकवून हैदराबाद एफसी साठी पहिला गोल केला. बार्थोलोमेव ऑग्बेचेने गोल सहाय्य केले. स्टेडियमवरील लाईट्सची समस्या निर्माण झाल्याने सामना दोन वेळा काही काळापुरता थांबवावा लागला होता. २३व्या मिनिटाला रिदीम तलांगाला वन ऑन वन परिस्थितीत हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणीला चकवायचे होते, परंतु कट्टीमणी बॉक्सच्या टोकावर येऊन उभा राहिला आणि गोवाचा प्रयत्न हाणून पाडला. हैदराबादचा बचाव सक्षम दिसत होता आणि गोवाला तो भेदता येत नव्हता. एफसी गोवाने चेंडूवर सर्वाधिक ताबा राखला खरा, परंतु हैदराबाद पहिल्या हाफमध्ये वरचढ ठरले. दोन्ही संघांकडून प्रत्येकी १-१ ऑन टार्गेट प्रयत्न झाले, पण यश हैदराबादच्या वाट्याला आले. गोवाचे ३ प्रयत्न ऑफ टार्गेट राहिले.
दुसऱ्या हाफमध्ये ५२व्या मिनिटाला नोवा सदूई चेंडू घेऊन पेनल्टी क्षेत्रात शिरला, परंतु हैदराबादचे बचावपटू त्याला रोखण्यासाठी सज्ज होते. पुन्हा एकदा गोवाला जवळ जाऊनही गोल करण्याची संधी साधता आली नाही. ५४व्या मिनिटाला हलिचरन नार्झरीने सुरेख प्रयत्न केला, परंतु चेंडू पोस्टला लागून माघारी फिरला. गोवाचे खेळाडू सातत्याने हैदराबादच्या पेनल्टी क्षेत्रात चेंडू घेऊन जात होते, परंतु यजमानांचा बचाव दमदार होता. मध्यंतरानंतर पहिल्या १५ मिनिटांत दोन्ही संघांकडून गोल करण्याचे २-३ प्रयत्न झाले. ६३व्या मिनिटाला फ्री किकवर गोवाने बरोबरीची आणखी एक संधी गमावली. ६६व्या मिनिटाला हिरो आयएसएलमधील सर्वाधिक गोल करणाऱ्या ऑग्बेचेला हैदराबादने बाहेर बोलावले आणि बोर्या हरेराला उतरवले.
गोवाच्या खेळाडूंमधील ताळमेळ चुकलेला प्रकर्षाने जाणवत होता. ७४व्या मिनिटाला हैदराबादने गोवावरील दडपण वाढवले होते. त्यांच्याकडून दुसरा गोल जवळपास झालाच होता, पण अखेरच्या क्षणाला तो रोखला गेला. ७५व्या मिनिटाला मोहम्मद यासिरच्या सुरेख पासवर हरेराने हेडद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोही चेंडू गोलपोस्टच्या बाजूने गेला. हैदराबादकडून आता सातत्याने आक्रमण होताना दिसले आणि स्टेडियमवर एकदम जल्लोष सुरू झाला. पण, ८२व्या मिनिटाला सामन्यात नाट्यमय वळण आले. आकाश मिश्राने पेनल्टी क्षेत्रात अलव्हारो व्हॅझकेजला पाडले आणि रेफरीने गोवाला पेनल्टी दिली. मात्र, ८४व्या मिनिटाला व्हॅझकेजचा हा प्रयत्न कट्टीमणीने रोखला.
८६व्या मिनिटाला सिव्हेरीयोने सुरेख रन बनवला होता आणि हैदराबादची आघाडी दुप्पट होईल असेच वाटत होते, परंतु गोवाच्या बचावपटूने त्याला रोखले. ६ मिनिटांच्या भरपाईवेळेत दोन्ही संघांची आक्रमकता वाढली आणि दोघंही गोल करण्याचा प्रयत्न करताना दिसले. ९०+५ व्या मिनिटाला गोवाचा आणखी एक प्रयत्न कट्टीमणीने हाणून पाडला. हैदराबादने या विजयासह खात्यातील गुणसंख्या १० करताना अव्वल स्थान पटकावले. हैदराबादचा संघ हिरो आयएसएलच्या यंदाच्या पर्वात आतापर्यंत एकही सामना न गमावलेला एकमेव संघ आहे. उभय संघांमध्ये हिरो आयएसएलच्या ७ लढतींमध्ये गोवाने ३ विजयांसह वर्चस्व गाजवले आहे. आजच्या निकालासह दोन लढती त्यांनी गमावल्या, तर दोन लढती अनिर्णित राहिल्या. मागील पर्वातील दोन सामन्यांत १-१ असा बरोबरीचा आणि ३-२ असा हैदराबादच्या बाजूने निकाल लागला होता.
निकाल : हैदराबाद एफसी १ ( झेव्हियर सिव्हेरियो ११ मि. ) विजयी वि. एफसी गोवा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एटीके मोहन बागानने जिंकली ‘कोलकाता डर्बी’! ईस्ट बंगाल एफसीवर २-० असा विजय
केव्हा आणि कुठे पाहाल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना? खेळपट्टी आणि हवामान अंदाजही घ्या जाणून