---Advertisement---

आयएसएल २०२०-२१ : हैदराबादची अखेरच्या पाच मिनिटांत बेंगळुरूविरुद्ध बरोबरी

On: गुरूवार, जानेवारी 28, 2021 11:09 PM
---Advertisement---

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात माजी विजेत्या बेंगळुरू एफसीला स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यातील अपयशी मालिका खंडित करण्यात गुरुवारी अपयश आले. हैदराबाद एफसीने सुमारे एका तासाअखेर दोन गोलांनी पिछाडीवर असूनही बेंगळुरूला 2-2 असे रोखले. अखेरच्या पाच मिनिटांत हैदराबादने एक गुण खेचून आणला. यात बदली स्ट्रायकर फ्रान सँडाझा याचा गोल मोलाचा ठरला.

वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. नवव्याच मिनिटाला बेंगळुरूच्या आघाडी फळीतील 36 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडू सुनील छेत्री याने संघाचे खाते उघडले होते. दुसऱ्या सत्रात आघाडी फळीतील केरळचा 22 वर्षीय खेळाडू लिऑन ऑगस्टीन याने बेंगळुरूची आघाडी भक्कम केली. त्यावेळी बेंगळुरूची पकड भक्कम वाटत होती, पण अखेरच्या क्षणी हैदराबादने प्रतीआक्रमण रचले. अवघी चार मिनिटे बाकी असताना आघाडी फळीतील स्पेनचा 33 वर्षीय खेळाडू अरीडेन सँटाना याने पिछाडी कमी केली. त्यानंतर आघाडी फळीतील स्पेनचा 36 वर्षीय बदली खेळाडू फ्रान सँडाझा याने हैदराबादला बरोबरी साधून दिली.

बेंगळुरूने या मोसमाला प्रारंभ चांगला केला होता. पहिल्या सहा सामन्यांत हा संघ अपराजित होता आणि त्यात त्यांनी तीन विजय मिळविले होते. त्यानंतर मात्र त्यांना सलग चार पराभव पत्करावे लागले. गेल्या आठ सामन्यांत पाच पराभव व तीन बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे. स्पेनच्या कार्लेस कुआद्रात यांना निरोप दिल्यानंतर हंगामी प्रशिक्षक नौशाद मुसा यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची विजयाची प्रतिक्षा लांबली.

बेंगळुरूने 14 सामन्यांत सहावी बरोबरी पत्करली असून तीन विजय व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 15 गुण झाले. त्यांनी नऊवरून सातवे स्थान गाठले. हैदराबादने चौथे स्थान कायम राखले. 14 सामन्यांत त्यांची ही सातवी बरोबरी असून चार विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 19 गुण झाले. पाचव्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेडचे 13 सामन्यांतून 18 गुण आहेत, पण नॉर्थईस्टचा एक सामना बाकी आहे. यंदाच्या मोसमात आणखी एक लढत बरोबरीत सुटल्यामुळे बाद फेरीतील प्रामुख्याने चौथ्या स्थानासाठीची चुरस आणखी वाढली आहे.

मुंबई सिटी 13 सामन्यांतून नऊ विजयांसह सर्वाधिक 30 गुण मिळवून आघाडीवर आहे. एटीके मोहन बागानचा दुसरा क्रमांक असून 13 सामन्यांतून 24 गुण अशी त्यांची कामगिरी आहे. तिसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवा संघाचे 13 सामन्यांतून 20 गुण आहेत.

खाते उघडण्याची शर्यत बेंगळुरूने जिंकली. सेट-पीसवर हा गोल झाला. डावीकडून मिळालेली फ्री किक मध्य फळीतील क्लेईटन सिल्वा याने घेतली. हा चेंडू गोलक्षेत्रात येताच सुनील छेत्रीने अचूक टायमिंग साधत उडी घेतली आणि अप्रतिम हेडरवर फिनिशींग केले. त्यावेळी हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला संधी मिळाली नाही.

बेंगळुरूचा बचाव भेदण्यात हैदराबादला अंतिम टप्प्यात यश आले. बदली स्ट्रायकर रोहित दानू याने मारलेला चेंडू बेंगळुरूचा बदली बचावपटू पराग श्रीवास याच्या पायाला लागून सँटानापाशी गेला. सँटानाने मग बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला चकविले.

भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटाला हैदराबादचा बदली मध्यरक्षक रोलँड अल्बर्ग याला सफाईदार फटका मारता आला नाही, पण त्याने बॉक्सलगत चेंडू धाडताच सँडाझाने बेंगळुरूच्या बचावपटूंना चकवित फिनिशींग केले.

महत्त्वाच्या बातम्या-

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

आयएसएल २०२०-२१ : केरला ब्लास्टर्स आणि जमशेदपूर एफसी यांच्यात रंगणार लढत; टॉप ४ मध्ये येण्यासाठी चुरस

आयएसएल २०२०-२१ : चेन्नईयीनने आघाडीवरील मुंबई सिटीला रोखले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---