मुंबई। सोमवारी (१६ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ६४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने १७ धावांनी विजय मिळवत प्लेऑफच्या शर्यतीतील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. दिल्लीचा हा ७ वा विजय होता. पण या विजयानंतरही एका गोष्टीमुळे दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत नाखूश होता.
दिल्लीचा विजय
या सामन्यात (Delhi Capitals vs Punjab Kings) दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १५९ धावा केल्या होत्या. दिल्लीकडून मिशेल मार्शने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. तसेच सर्फराज खानने ३२ धावांचे आणि ललित यादवने २७ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कर्णधार पंत (Rishabh Pant) देखील एका षटकारासह ७ धावा करून बाद झाला. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोन आणि आर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या पंजाबच्या विकेट्स नियमित कालांतराने पडल्या. त्यामुळे २० षटकात त्यांना ९ बाद १४२ धावाच करता आल्या. जितेश शर्माने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तसेच जॉनी बेअरस्टोने २८ आणि राहुल चाहरने २५ धावा केल्या. याबरोबरच शिखर धवनने १९ धावांचे योगदान दिले. मात्र, या चौघांव्यतिरिक्त कोणीही दोन आकडी धावसंख्या पार करू शकले नाही. दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
मी आत्ता फक्त २४ वर्षांचा – रिषभ पंत
या सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सच्या लाईव्ह शोमध्ये समालोचक हरभजन सिंगने पंतला त्याच्या खेळीबद्दल विचारले. त्यावेळी पंत म्हणाला, ‘आम्ही सर्वच १०० टक्के योगदान प्रत्येक सामन्यात देतो. लवकर बाद झालो, त्याबद्दल मी नक्कीच थोडा निराश आहे. पण पुढील सामन्यातही मी याच मानसिकतेने उतरेल.’ त्यानंतर हरभजनने पंतकडे २५ ऐवजी ७५ धावांची खेळी करण्याच्या शुभेच्छा दिल्या.
पण, याच शोमध्ये दिल्लीचा अष्टपैलू अक्षर पटेल मजेने म्हणाला, आता ७५ धावांची खेळी करण्याची वेळ आली आहे. मोहम्मद कैफनेही त्याला दुजोरा देत म्हणले की, मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. यावर हरभजन पंतला म्हणाला, तू खूप मोठ-मोछ्या खेळ्या केल्या आहेत. त्यावर पंतने हसून उत्तर दिले की, ‘मी आत्ता केवळ २४ वर्षांचा आहे.’ पंतचे हे उत्तर ऐकून मात्र, कोणालाही हसू आवरले नाही.
पंतची आयपीएल २०२२ मधील कामगिरी
पंतची आयपीएल २०२२ मधील (IPL 2022) कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्याने १३ सामन्यांत ३०.१० च्या सरासरीने ३०१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एकाही अर्धशतकाचा किंवा शतकाचा समावेश नाही. त्याची ४४ ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्लीच्या पंजाबवरील विजयानंतर कोणाला आहे प्लेऑफसाठी सर्वाधिक चान्स? जाणून घ्या समीकरण
संघमालकाने वॉर्नला इमोशनल केलं आणि राजस्थान रॉयल्स बनला पहिला आयपीएल चॅम्पियन
‘कॅरेबियन फ्लेवर’शिवाय आयपीएलला मजा नाय