चेन्नई। मंगळवारी(23 एप्रिल) आयपीएल 2019मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 6 विकेट्सने विजय मिळवला.
चेन्नईच्या या विजयात शेन वॉटसनने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ससाठी विजयी खेळी साकारताना 53 चेंडूत 96 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 6 षटकार मारले.
मात्र त्याचे आयपीएलमधील 5 वे शतक केवळ 4 धावांनी हुकले. त्याला सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमारने बाद केले. पण वॉटसन बाद झाला तेव्हा चेन्नई सुपर किंग्स विजयाच्या समीप पोहचले होते.
वॉटसनला त्याच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. वॉट्सन मागील काही सामन्यात धावा करण्यात संघर्ष करत होता. त्याने पहिल्या 10 सामन्यात फक्त 147 धावा केल्या होत्या.
पण तरीही त्याला अंतिम 11 जणांच्या संघात सातत्याने संधी देत पाठिंबा दिल्याने त्याने या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आणि प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांचे आभार मानले आहेत.
तो म्हणाला, ‘नक्कीच मी धावा करण्यासाठी संघर्ष करत होतो. तरीही एमएस धोनी आणि स्टिफन फ्लेमिंगने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी त्यांचे शब्दात आभार मानू शकत नाही. मी खेळलेल्या अनेक संघांनी आत्तापर्यंत मला संघातून वगळले असते. पण यांनी माझ्यावर विश्वास दाखवला.’
‘मी पीएसएल(पाकिस्तान सुपर लीग) आणि बीबीएल(बीग बॅश लीग)मध्ये चांगला खेळलो होतो. पण नंतर मला आज जशी होती तशी लय सापडत नव्हती. आज भुवनेश्वर मला वरचढ ठरला. तो एक चांगला गोलंदाज आहे. तो दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करु शकतो.’
सामन्यानंतर धोनीनेही वॉटसनचे कौतुक केले आहे. धोनीने वॉटसनला मॅच विनर खेळाडू आहे, असे म्हटले असून संघ व्यवस्थापन त्याला जास्तीत जास्त संधी देऊ इच्छित होती, असेही सांगितले आहे.
मंगळवारी पार पडलेल्या सामन्यात हैद्राबादने डेव्हिड वॉर्नर(57) आणि मनिष पांडे(83*) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 175 धावा केल्या होत्या. त्यानंतर 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने वॉट्सनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 19.5 षटकात 4 बाद 176 धावा करत सहज विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
–महिला आयपीएल २०१९: बीसीसीआयने घोषित केले महिला ट्वेंटी २० चॅलेंजचे वेळापत्रक
–आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये महाराष्ट्राच्या राहुल आवारेला कांस्यपदक
–Video: निवृत्तीआधी सीएसकेच्या यशाचे गुपित सांगण्यास एमएस धोनीचा नकार, हे आहे कारण