चेन्नई। मंगळवारी(23 एप्रिल) आयपीएल 2019मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 6 विकेट्सने विजय मिळवला.
चेन्नईचा हा या मोसमातील 8 वा विजय आहे. या विजयाबरोबरच त्यांनी प्लेऑफमधील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्सने आत्तापर्यंत त्यांनी खेळलेल्या सर्व आयपीएल मोसमात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्वाधिकवेळा आयपीएलमधील प्लेऑफमध्ये खेळण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
त्यामुळे मंगळवरी पार पडलेल्या सामन्यानंतर हर्षा भोगले यांनी प्रेसेंटेशनमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीला चेन्नईच्या या यशाचे गुपित काय असा प्रश्न विचारला. यावर धोनीने गमतीशीर उत्तर दिले.
तो म्हणाला, ‘मी जर हे गुपित सर्वांना सांगितले तर ते(सीएसके) मला लिलावात खरेदी करणार नाही. हे एक रहस्य आहे.’
धोनी पुढे म्हणाला, ‘प्रेक्षक आणि फ्रांचायझीचा पाठिंबा हे नक्कीच महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर याचे मोठे श्रेय सपोर्ट स्टाफला जाते. ते संघाचे वातावरण चांगले ठेवतात. यापेक्षा मी निवृत्त होईपर्यंत अधिक काही उघड करु शकत नाही.’
चेन्नईने आत्तापर्यंत 10 आयपीएल मोसम खेळले आहेत. त्यांच्यावर स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणामुळे 2016 आणि 2017 या वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्यांना या दोन आयपीएल मोसमात सहभागी होता आले नव्हते.
पण त्यांनी आयपीएलमध्ये 2018 ला पुनरागमन करत तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. याआधी 2010 आणि 2011 ला चेन्नईने आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.
Will @msdhoni tell @bhogleharsha the secret to @ChennaiIPL's consistency, season after season ????#CSKvSRH pic.twitter.com/FMasdNUqzP
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2019
मंगळवारी पार पडलेल्या सामन्यात हैद्राबादने डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 175 धावा केल्या होत्या. चेन्नईकडून गोलंदाजीत हरभजन सिंगने 2 आणि दीपक चहरने 1 विकेट घेतली.
त्यानंतर हैद्राबादने विजयासाठी दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून शेन वॉटसनने 96 धावांची शानदार विजयी खेळी साकारली. त्याला सुरेश रैना आणि अंबाती रायडूला चांगली साथ दिली. त्यामुळे चेन्नईने 19.5 षटकात 4 बाद 176 धावा करत सहज विजय मिळवला.
हैद्राबादकडून गोलंदाजीत कर्णधार भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
–मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हा वेगवान गोलंदाज होणार सामील