आयपीएल 2019 ची स्पर्धेतील चूरस हळूहळू वाढत चालली आहे. सर्वच संघांचे जवळजवळ 10 सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. अशातच मुंबई इंडियन्सच्या संघात दुखापतग्रस्त अल्झारी जोसेफचा बदली खेळाडू म्हणून बोरन हेंड्रीक्स हा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज सामील होणार आहे.
मुंबईला या आयपीएलमध्ये दोनदा खेळाडूंना दुखापत झाल्याने धक्का बसला आहे. आयपीएलच्या सुरुवातीला ऍडम मिलने हा दुखापतीमुळे आयपीएल 2019 मधून बाहेर पडला होता. त्यामुळे मुंबईने त्याचा बदली खेळाडू म्हणून आल्झारी जोसेफला संघात घेतले होते.
त्यानेही त्याची निवड योग्य ठरवत 6 एप्रिलला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करताना 12 धावांतच 6 विकेट घेत इतिहास रचला होता. तो आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा गोलंदाज ठरला होता.
पण त्यानंतर आठवड्याभरातच त्याला खांद्याची दुखापत झाल्याने या आयपीएल मोसमातून बाहेर पडावे लागले आहे. आता त्याच्या ऐवजी मुंबईने संघात हेंड्रीक्सला संधी दिली आहे.
हेंड्रीक्स याआधी आयपीएलमध्ये 2014 आणि 2015 ला किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये 7 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. 36 धावांत 3 विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
त्याचबरोबर हेंड्रीक्सने 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातून दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेकडून 10 टी20 आणि 2 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने टी20मध्ये 16 आणि वनडेमध्ये 1 विकेट घेतली आहे.
तसेच त्याने आत्तापर्यंत 64 ट्वेंटी20 सामने खेळले असून त्याने 8.31 च्या इकोनॉमी रेटने 89 विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्स सध्या आयपीएलच्या 12व्या मोसमात 10 सामन्यांपैकी 6 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा पुढील सामना 26 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–जेव्हा हिटमॅन रोहित शर्मा उडवतो युजवेंद्र चहलची खिल्ली…
–रिषभ पंतसाठी आयपीएलमधील हा आहे सर्वात खास क्षण, पहा व्हिडिओ