मागील अनेक महिन्यांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नव्या रणजी ट्रॉफी हंगामाची धमाकेदार सुरूवात केली आहे. आजपासून (११ ऑक्टोबर) भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची स्पर्धा रणजी ट्रॉफीचा २०२६-२७ हंगाम सुरू झाला. या स्पर्धेत शमी बंगालचे प्रतिनिधित्व करतो. त्याने पहिल्याच सामन्यात लक्षवेधी कामगिरी केली.
कलयानीच्या बंगाल क्रिकेट अकॅडमी येथे सुरू असलेल्या बंगाल विरुद्ध दिल्ली सामन्यात शमीने आपल्या कौशल्याचा नमुना सादर केला. या सामन्यात बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला.
दिल्लीच्या पहिल्याच डावात शमीने फलंदाजांना चांगलाच त्रास दिला. त्याने १७.३ षटकांत ३० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने ९ षटके निर्धाव टाकली. तसेच त्याला आकाश दीप, मुकेश कुमार आणि आमीर गनी यांनीही चांगली साथ दिली.
या डावात आकाश दीपने २ विकेट्स, आमीरने ३ विकेट्स आणि मुकेशने एक विकेट घेतली. यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपला असता दिल्लीचा पहिला डाव २४० धावसंख्येवर संपुष्टात आला.
शमीची कामगिरी
शमीने आपल्या पहिल्या स्पेलमध्ये तीन षटके टाकली. यामधील दोन षटके निर्धाव होती. त्याने दिल्लीच्या पहिल्या डावात यश धुल (९), आयुष डोसेजा (४५), हृतिक शौकिन (५६) आणि दिविज मेहरा (२४) यांना बाद केले. (Mohammed Shami’s sensational bowling vs Delhi in the Ranji Trophy 2026-27 Elite Group B)
नव्या संघाकडून उमेश यादवची अप्रतिम सुरूवात
यंदाच्या रणजी ट्रॉफी हंगामात पंजाबकडून खेळणाऱ्या उमेश यादवनेही चांगली कामगिरी केली. त्याने आसामविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात ७ षटकात १८ धावा देत २ विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने ३ षटके निर्धाव टाकली.
उमेशने १८ वर्ष विदर्भकडून खेळल्यानंतर यावर्षी पंजाब संघाशी साथ जोडली.
भारतीय कसोटी सलामीवीरांची निराशाजनक कामगिरी
भारताच्या कसोटी संघाचे महत्त्वाचे फलंदाज केेएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांची या स्पर्धेत निराशाजनक सुरूवात झाली. मुंबईकडून खेळणाऱ्या यशस्वीला चंदीगडविरुद्ध १३ चेंडूंचा सामना करून भोपळाही फोडला आला नाही. दुसरीकडे कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणारा राहुल आंध्र प्रदेशविरुद्ध चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.






