---Advertisement---

विश्वचषकासाठी संघातील समावेश प्रकरणाबाबत डिविलियर्सने सोडले मौन, केला मोठा खूलासा

---Advertisement---

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी खराब झाली आहे. त्यांचे या विश्वचषकात साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांना त्यांच्या पहिल्या 4 सामन्यात सलग पराभव स्विकारावा लागला होता. त्यांनी भारताविरुद्ध 5 जूनला या विश्वचषकातील त्यांचा सलग तिसरा पराभव स्विकारला होता.

मात्र या पराभवानंतर असे वृत्त आले होते की दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिसकडे विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने ही ऑफर ज्यादिवशी विश्वचषकासाठी संघ घोषित होणार होता, त्याच्या आदल्या दिवशी दिली होती. पण दक्षिण आफ्रिका बोर्डाने याऑफरला नकार दिला होता.

यानंतर डिविलियर्सवर टिकाही झाली तसेच तो अनेक दिवस चर्चेत राहिला होता. यादरम्यान त्याने मात्र कोणतेही भाष्य केले नव्हते. पण आता दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर याप्रकरणाबाबत डिविलियर्सने खूलासा केला आहे.

त्याने या प्रकरणाचा खूलासा सोशल मीडियातून केला आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की ‘दक्षिण आफ्रिकेचे विश्वचषकातील आव्हान संपले आहे त्यामुळे संघाचे लक्ष विचलित होणार नाही. मला माझ्यावर या विश्वचषकादरम्यान झालेल्या टिकेबद्दल स्पष्टीकरण द्यायचे आहे.’

‘मला विश्वचषकासाठी संघ जाहिर होण्याआधी झालेल्या वैयक्तिक संभाषणाबद्दल सातत्याने विचारणा केली जात आहे. माझी प्रतिक्रिया विचारली जात आहे. मी आता याबाबत स्पष्टीकरण देत आहे.’

‘सर्वप्रथम मी मे 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. कारण मला माझ्यावरचा कामाचा ताण कमी करायचा होता आणि माझ्या पत्नीबरोबर आणि लहान मुलांबरोबर वेळ घालवायचा होता. पण काही लोकांनी त्याचा अर्थ मी पैशासाठी निवृत्ती घेतली असा लावला. ते चूकीचे आहे.

‘खरं असे आहे की मला जगभरातून खेळण्यासाठी अनेक आकर्षक ऑफर आल्या होत्या आणि त्यातील मी काही नाकारल्या. त्यामुळे मी प्रत्येक वर्षातील आठ ऐवजी तीन महिने घराबाहेर राहण्याचा पर्याय निवडला.’

‘दुसरी गोष्ट म्हणजे, ज्यावेळी मी निवृत्तीची घोषणा केली, तेव्हा मला वैयक्तिकरित्या अनेकांनी विश्वचषकात खेळणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी सहज हो असे म्हटले. पण सर्व झाल्यावर मला असे वाटते त्याचवेळी मी स्पष्टपणे फक्त नाही असे म्हणायला हवे होते. पण माझ्या स्वभावात नाही असे म्हणणे नसल्याने मी त्यावेळी तसे केले.’

‘त्यानंतर अनेक आठवडे आणि महिन्यांदरम्यान माझ्यात आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाबरोबर, संघाबरोबर कोणतेही अधिकृत संभाषण झालेले नाही. मी त्यांच्याशी संपर्क केला नाही आणि त्यांनीही माझ्याशी संपर्क केला नाही.’

‘मी माझा निर्णय घेतला आणि त्यातुन संघ पुढे गेला. संघाने प्रशिक्षक ओटिस गिब्सन आणि शानदार कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे यश मिळवले.’

‘फाफ आणि मी शाळेपासूनचे मित्र आहोत आणि मी विश्वचषकासाठी संघ जाहिर होण्याआधी दोन दिवसापूर्वी त्याच्याशी सहज बोलण्यासाठी त्याला फोन केला होता.’

‘मी इंडियन प्रीमीयर लीग दरम्यान चांगल्या लयीत होतो. मी पुन्हा सांगतो एक वर्षापूर्वी जेव्हा मला विचारले होते की मी विश्वचषकासाठी उपलब्ध आहे का त्यावेळी मी जर गरज असेल तर असे सांगितले होते. फक्त गरज असेल तरच. मी कोणतीही मागणी केली नव्हती.’

‘मी निश्चितपणे संघात निवड होण्यासाठी प्रयत्न केले नाही आणि संघात समावेश व्हावा अशी अपेक्षाही केली नाही. माझ्याकडून कुठलीही समस्या नव्हती किंवा अन्यायाचा प्रश्न नव्हता.’

‘त्यानंतर जेव्हा दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध पराभूत झाला त्यावेळी माझ्या वैयक्तिक संभाषणातील काही भाग मीडियामध्ये उघड करण्यात आला आणि मला चूकीच्या पद्धतीने प्रकाशझोतात आणण्यात आले.’

‘ही गोष्ट माझ्याकडून किंवा माझ्या संबंधित असणाऱ्या कोणाकडून किेंवा फाफ कडूनही उघड करण्यात आली नाही. कदाचीत कोणालातरी टिकेचा विषय बदलायचा होता. मला माहित नाही.’

‘त्यामुळे मला गर्विष्ठ, स्वार्थी आणि अनिश्चित असल्याचे म्हटले गेले. पण माझे विचार स्पष्ट होते. मी प्रामाणिक कारणांमुळे निवृत्ती घेतली आणि मला जेव्हा विश्वचषकाच्या उपलब्धतेबद्दल विचारण्यात आले, तेव्हा मी त्या पर्यायासाठी दार उघडे ठेवण्याची तयारी दाखवली.’

‘अखेर संघ पुढे गेला आहे. काहीच समस्या नाही. मी कोणावरही चिडलेलो नाही. सध्या यावेळी मी माझ्या कुटुंबाबरोबर आणि मित्रांबरोबर वेळ घालवणे आणि दक्षिण आफ्रिका आणि जगभरातील निवडक टी20 स्पर्धा खेळणे चालू ठेवणार आहे.’

‘मला माझ्या देशासाठी क्रिकेट खेळल्याचा आणि नेतृत्व केल्याचा खूप अभिमान आहे. माझे दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंबरोबर असलेले नाते पहिल्यासारखेच मजबूत आहे. मी पुढील पिढीला पाठिंबा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच उपलब्ध आहे.’

‘या वाईट प्रकरणाबाबात माझी बाजू मांडल्यानंतर मी एवढेच सांगतो की माझा संघाला आणि ज्या खेळाने माझे आयुष्य घडवले, मला खूप चांगले मित्र आणि संधी दिल्या त्याला माझा कायम पाठिंबा असेल.’

डिविलियर्सने मागीलवर्षी मे महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: १६ वर्षांपूर्वीचा पाँटिंगचा विक्रम मोडत जो रुटने रचला इतिहास

तब्बल ३२७ महिन्यांनतर इंग्लंडच्या संघाने केला असा मोठा पराक्रम

इंग्लंडला फायनलमध्ये पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचललेल्या रॉयला झाली ही मोठी शिक्षा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment