Virat Kohli :- भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा वनडे सामना कोलंबो या मैदानावर खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्यामधील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील या तिसऱ्या सामन्यात देखील भारताचा 110 धावांनी दारुण पराभव झाला. या मालिकेत अनुभवी विराट कोहली हा अपयशी ठरला. त्यानंतर आता त्याच्याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Akash Chopra) याने महत्त्वाचे विधान केले आहे.
अनुभवी विराट कोहली या तिन्ही सामन्यात विशेष योगदान न देता पायचित झाला. त्याबद्दल बोलताना माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणाला, “विराट वनडे मालिकेतील तीनही सामन्यात पायचित झाला. विशेष म्हणजे त्याला तीनही वेळा फिरकी गोलंदाजांनी बाद केले. मला आठवत नाही यापूर्वी विराटसोबत अशी गोष्ट केव्हा घडली होती. त्याला चेंडू समजत नव्हते. कारण दरवेळी तो चुकीची लाईन खेळताना दिसला. त्याने तीनही वेळी डीआरएसचा वापर केला मात्र त्याला यश मिळाले नाही. तो मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरला.”
विराट पहिल्या सामन्यात 24 तर दुसऱ्या सामन्यात 14 धावांवर बाद झाला आहे. तिसऱ्या सामन्यात त्याने 18 चेंडूंचा सामना करताना 20 धावा केल्या होत्या. विराट या मालिकेनंतर थेट बांगलादेशविरूद्ध खेळताना दिसेल. ही कसोटी मालिका सप्टेंबर महिन्यात भारतात खेळली जाईल. तर, पुढील वनडे मालिका थेट जानेवारी महिन्यात भारतीय संघ खेळेल.
अखेरच्या सामन्यात 249 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 138 धावांवर गारद झाला. मालिकेतील तीनही सामन्यात भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. विशेषतः श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजां पुढे रोहित शर्मा वगळता कोणताच फलंदाज टिकाऊ धरू शकला नाही. यासोबतच 27 वर्षांनंतर भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पराभव झाला. गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या पहिल्याच वनडे मालिकेत भारतीय संघाला हा पराभव पाहावा लागला आहे.
हेही वाचा –
भारतीय खेळाडू विश्रांतीवर असताना ‘या’ खेळाडूच्या नेतृत्त्वाखाली सूर्यकुमार खेळणार देशांतर्गत क्रिकेट
पदक जिंकल्यानंतर मनू भाकरवर पैशांचा वर्षाव, क्रीडामंत्र्यांनी दिला इतक्या रुपयांचा धनादेश
विनेश फोगटवर सरकारने केला चक्क इतका खर्च, आकडा जाणून बसेल धक्का