भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव स्मिथ अपयशी ठरतो आहे. स्मिथने २ सामन्यात ४ डाव खेळतांना अवघ्या १० धावा केल्या आहेत. भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनने दोन वेळा या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या फलंदाजाची शिकार केली. आपल्या या खराब फॉर्ममागच्या कारणाचा उलगडा स्टीव स्मिथने स्वत:च केला आहे.
अश्विनला दिली दबाव टाकण्याची संधी
स्टीव स्मिथने आपण अश्विनला दबाव निर्माण करण्याची संधी देत आहोत, अशी कबुली दिली. तसेच ही संधी यापूर्वी कुठल्याही गोलंदाजाला दिली नसल्याचेही त्याने नमूद केले. तो म्हणाला, “मी अश्विनला सतत माझ्यावर दबाव टाकू देण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि अश्विनने त्या संधीचा अचूक फायदा उठवला. मी अधिक चांगल्या पद्धतीने त्याचा सामना करू शकत होतो, मात्र मी केला नाही.”
या मालिकेत स्मिथने १, १*, ० आणि ८ अशा धावा काढल्या आहेत. या फॉर्मबद्दल बोलताना तो म्हणाला, “मला माझा नैसर्गिक खेळ खेळणे आवश्यक आहे. ती दुधारी तलवार आहे, परंतु तोच सर्वोत्तम मार्ग आहे. मी खेळपट्टीवर अधिक काळ टिकून मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. या वर्षातील माझी सगळ्यात मोठी खेळी मी ६४ चेंडूत केली होती, जी भारताविरुद्धच्या वनडे सामन्यात आली होती. मात्र हे पुरेसे नाही. मी नेट्समध्ये सरावात मेहनत घेतो आहे. परंतु सरावात आणि प्रत्यक्ष सामन्यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. मी मैदानात लय शोधण्याचा प्रयत्न करतो आहे, मात्र जागतिक दर्जाच्या गोलंदाजीसमोर ते वाटते तितके सोपेही नाही.”
भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत ८ गडी राखून ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. त्यामुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आता १-१ अशी बरोबरी झाली आहे. या मालिकेतील तिसरा सामना ७ जानेवारीपासून खेळविण्यात येईल.
संबधित बातम्या:
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– डोंगरा एवढं दुःख पचवून तो लढला आणि जिंकला सुद्धा!
– तिसऱ्या कसोटीपूर्वी रोहितच्या पुनरागमनाबद्दल अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, म्हणाला